माणूसच त्याच्या जीवनाचा शिल्पकार असतो, त्यानुसार म्हणतात, ‘बदाम खाण्यापेक्षा अधिक ठेच खाण्याने स्मरणशक्ती अधिक विकसित होते, असा वास्तव अनुभव मिळतो, ती तानाजी धरणे यांची आत्मकथनात्मक ‘हेलपाटा’ ही कादंबरी आहे. त्यात ग्रामीण जीवनशैली, संयुक्त कुटुबातील एकोपाचे वर्णन केले आहेत. भाऊंचे व बाईचे म्हणजेच आई-वडिलांचे आण्णा म्हणजेच मोठे भाऊ, मामा, काका आणि आपली भावंड कुसुम म्हणजे बटर विशेषत्वाने आवडले.
लेखकाचे शिक्षणाविषयीची आस्था, नातेसंबंधातील प्रेम, बौद्धिक हुशारी, चिकाटी आणि कष्टाचं मोल हे गुणवैशिष्ट्य छान आहेत. त्यामुळेच गरिबी दारिद्र्यात न जगता आधुनिक जीवन जगण्याची संधी मिळाली, प्रत्येक वळणावर मिळालेले मार्गदर्शक गुरुजन, आजी यांच्यामुळेच आपले ग्रामसेवक या पदापर्यंत प्रवास प्रचंड कष्टातून साकार झाले. कादंबरी वाचतांना डोळ्यातून पाणी येतं, मन भरून जातं, गरिबी काय असते ? याचा प्रत्यय यातून मिळतो.
ग्रामीण भागात असलेली ज्वारीची शेत, ऊसाची शेत, गुऱ्हाळ, अत्यंत कष्टदायक पशुपालनाचा जोडधंदा निसर्ग आणि माणसाच्या सान्निध्याचे वर्णन, मांजर,कोंबड्या, शेळी यांच्यावरही लेखकाची असलेली माया, त्यापरिप्रेक्ष्यात वापरले जाणारे शब्द आजीची कावळ्याची गोष्ट, सातवीतून शाळा सोडल्यानंतर मुंबईपर्यंतचा प्रवास या गोष्टी सुंदररीतीने रेखाटल्या आहेत. येथे आंनद यादव यांची गोतावळा कादंबरीची आठवण होते. हेलपाटा वाचतांना केंद्रस्थानी ग्रामीण दुष्काळी भागात अन्नपाण्यावाचून काढलेले वेदनादायी व भयानक दिवस? गरीबीचे चटके सहन सोसलेले, भोगलेले लेखक लेखक तानाजी धरणे आणि त्यांचे कुटुंब.
कष्टाच्या जीवावर त्यांनी खडतर प्रवास करून शोधलेला सुखाचा मार्ग. संवेदनशील मनाचे श्री तानाजी धरणे यांची ‘हेलपाटा’ संघर्षमय जीवनावर मात करायला लावणारी, मनाला हेलावून टाकणारी कादंबरी आहे. त्यातील अनेक प्रसंग माणसाला विचार करायला भाग पाडणारे आहेत. एखाद्याच्या जीवनामध्ये संकट येतात, ते त्याला जीवन यशस्वी करण्यासाठीच असा विश्वास मनात येतो. हा थक्क करणारा जीवन प्रवास वाचून अनेकांना नक्कीच प्रेरणा मिळेल, लेखक आज चांगल्या पद्धतीने आयुष्य जगत आहेत. तरीदेखील भूतकाळातील कष्टाची जाण झाल्याशिवाय राहत नसल्याचे अभिमानाने सांगतात,’ की माझे वडील सालगडी होते. पण जगातले सर्वात बेस्ट बाबा होते.’ यावरून त्यांचे कुटुंब आणि वडिलांच्यावर प्रेम लक्षात येते. नुसते कुटुंबावरच नाही तर त्यांनी पाळलेली खिल्लारी गाय. या गायीला तर त्यांनी कुटुंबांची तारणहार व देवाचा दर्जा दिला आहे.
कुटुंबातील जरी हे धाकट भावंड,असलं तरी छोट्या वयात त्यांनी खूप मोठमोठ्या जबाबदाऱ्या सांभाळत छंद सुद्धा, जोपासले. लहानपणी त्यांनी वाघाचे सोंग घेतले. तेव्हापासून त्यांना त्यांचे मोठे भाऊ अर्थात आण्णा हे लाडाने ‘वाघ्या’ म्हणून हाक मारायचे. कपड्यावरून जरी माणसाचे व्यक्तिमत्व ठरत असले तरी आपण आपला साधेपणा जपला पाहिजे, यातून साधेपणाचे समर्थन करतात. कादंबरीत मध्यमवर्गीयांचे चित्रण अधोरेखित झाल्याने त्यात अनेक प्रसंग आहेत, त्यातील एक घरामध्ये पैशाची अडचण होती. बहिणीचं लग्न जमलं होतं. म्हणून बैलं विकायला काढले. बैलं घेऊन बाजारात गेले व एकच बैल विकला. म्हणून दुसरा बैल घेऊन परत घरी येऊ लागले. अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला. नदीला पूर आला.
अशा परिस्थितीमध्ये अंधाऱ्या रात्रीत पडत असलेल्या पावसात लेखकाचे वडील म्हणजेच भाऊ नदीच्या कडेला असलेल्या झाडाला, बैल बांधून तिथेच भिजत बसून राहिले. अंधारामुळे नदीच्या पाण्यात बैल वाहून गेलेला त्यांना समजलेच नाही.रात्रभर भिजल्यामुळे कानाला त्यांच्या दुखापत होऊन ते जन्माचे अधू झाले. भाऊंच्या, नशिबी आलेले दारिद्र्य दूर करताना त्यांची दमछाक व्हायची. तरीही त्यांची इच्छाशक्ती प्रबळ असल्याचे लेखकाने विशद केले आहे.
लेखकाचे भाऊ म्हणजे ‘अण्णा’ घरात, समाजात वावरताना,एकदम शांत,संयमी व परिस्थितीचे भान ओळखून वागणारी व्यक्ती. पण जर कोण अन्याय करेल तर त्याला पद्धतीने जशास तसे प्रत्युत्तरही देत असत. एक दिवस विनाकारण कामाचा खाडा त्यांचे मालक व मुकादम लावायला लागले. त्यावेळी त्यांनी विरोध केला असता ते अण्णाला, मारण्यासाठी धावले. त्यावेळी त्यांचा स्वाभिमान दुखावला गेला.मनामध्ये एक ऊर्जा निर्माण झाली.
आपण गरीब नक्की आहोत पण लाचार नाही.याची जाणीव त्यांना झाली व अण्णाचा पारा चढला. आपल्यासमोर मालक उभा आहे. हेही ते विसरले व मुकादमाला आणि मालकाला त्यांचा हिसका दाखवला. लेखकाने त्यांच्या जीवनप्रवासाचे वर्णन करत असताना, अनेक प्रेरणादायी वाक्य या कादंबरीची बलस्थाने आहेत. संघर्ष केल्याशिवाय सुखाचे दिवस येत नाहीत. संघर्षामुळे व्यक्ती घडतो व व्यक्तीमुळे समाज घडतो. दुःखाची दरी ओलांडल्याशिवाय, सुखाची हिरवळ दिसणार नाही. जीवनात कितीही संकटे आली तरी मागे हटायचे नाही. अशा वाक्यांनी लेखकाला हे संघर्षासाठी बळ दिल असेल. अतोनात कष्ट, उपासमार व हालपेष्ठा यावर मात करत, प्रतिकूल परिस्थितीतून वाट कशी शोधायची हे या कादंबरीतून शिकायला मिळते. कुटुंबावर आलेली उपासमारीची वेळ निभावून नेण्यासाठी, इयत्ता सातवीत असल्यापासून मुंबईला कामासाठी व धंद्यासाठी ‘हेलपाटे’, मारायला केलेली सुरुवात नक्कीच कुटुंबाला उभारी द्यायचं काम करते.
मुंबईला राहून कमावलेली रक्कम, ज्यावेळी त्यांच्या वडिलांच्या पुढे ठेवली जाते. त्यावेळी त्यांच्या डोळ्यातून खळकन अश्रू वाहतात. कारण त्यांनी जीवनामध्ये एकावेळी एवढे पैसे कधीच पाहिलेले नसतात. आपण ज्यावेळी घरापासून,आपल्या माणसापासून, आपल्या गावापासून दूर जातो तेव्हा जग किती विचित्र आणि किती विशाल आहे याचा प्रत्यय येतो. हे लेखकाचे अनुभव ऐकताना अंगाचा थरकाप उठतो.
एकूणच आई-वडील शेजारी-पाजारी,प्राणी, मित्र आणि सुखी जीवनाचा सन्मार्ग दाखविणारे शिक्षक यांच्या प्रती आदर व कृतज्ञता व्यक्त करतात. त्यांचे गुरुवर्य श्री फोजमल पाखरे सर म्हणतात, ‘काट्यांनी भरलेल्या वनातून चाललास म्हणून तुला केवड्याचा सुगंध भेटला..’. कसेतरी एक महिना दादा खेसेच्या सोबत सायकलवर कॉलेज केले. तो माझ्यापेक्षा खूप छोटा होता. सर्व गुरुवर्य मनापासून मुलांना शिकवत होते. पण माझे कॉलेजला अजिबात मन लागत नव्हते. अकरावीची सर्व मुलं माझ्यापेक्षा वयाने कितीतरी छोटी होती. तो न्यूनगंड मनात होताच शिवाय आपले आत्ताचे शिक्षण म्हणजे “शिळ्या कढीला ऊत ” अशीच स्थिती होती. एकदीड महिना गावी राहिलो त्या दरम्यान आजारीही पडलो. जवळचे सर्व पैसे संपत आले होते. तशा कॉलेजच्या माझ्या दांड्या वाढू लागल्या.
हळूहळू मनात येवू लागलं आपण उगीच भावनेच्या भरात कॉलेजला प्रवेश घेतला. माझाच मला तिरस्कार वाटु लागला. तेवढ्यात एक आशेचा किरण दिसला. “आमचे मित्र राजेंद्र म्हाळस्कर याने रत्नागिरी गुहागरवरुन कोकण निवड मंडळाने ग्रामसेवक भरतीसाठी अर्ज मागवल्याची दै. नवाकाळची बातमी पाठवली ती वाचून वाटलं ” भगवान के घर मे देर है, पर अंधेरा नहीं “! बातमी नीट दोन तीन वेळा वाचली.त्यातील बारकावे पाहुन घेतले व दुसर्या दिवशी शिरुरला जाऊन सर्व कागदपत्राच्या झेरॉक्स व लागणारे कोर्ट फी स्टॅम्प आणले. कर्ड्यात कॉलेजला जाऊन सत्य प्रती करुन घेतल्या.
दुसर्या दिवशी सकाळी एस.टी. ने फॉर्म रजिस्टर करण्यासाठी न्हावरेला गेलो. पोष्टात जाऊन फॉर्म पुन्हा – पुन्हा वाचला. काही चुका तर नाहीत ना ते पाहिले .तो फॉर्म कोकण निवड मंडळाच्या नावाने रजिस्टर केला. रजिस्टरचे पैसे दिले. नक्की आठवत नाही परंतु वीस-बावीस रुपये असे काहीतरी होते. फॉर्म रजिस्टर केला त्याची पावती घेतली. अर्जाची पोहच यावी म्हणून पोहच जोडली. मनावरचा कित्येक मनाचा बोजा कमी झाला. आपण ग्रामसेवक झाल्याचा फिल आला. तहानभूक हारल्यासारखं झालं. न्हावरा ते आंबळे चार- पाच रुपये एस.टी.चे तिकीट असावे परंतु तिकिटापेक्षा ” एक रुपया” माझ्याकडं कमी होता.त्यामुळे घरी बसने जाता येईना. न्हावर्यात मित्र बरेच होते परंतु एक रुपया कोणाला मागणेचे धाडस मला झाले नाही. फॉर्म भरल्यामुळे आनंद खूप झाला होता. त्यापुढे ही अडचण मला क्षुल्लक वाटत होती.
एक रुपया कोणाला मागण्याऐवजी मी सरळ आंबळ्याचा रस्ता पकडला व चालू लागलो. मी चालत-चालत न्हावरा ते आनोसेवाडी आठ किलोमीटर भर उन्हात चालत आलो. पण मला बिल्कुलही थकवा आला नाही किंवा वाईटही वाटलं नाही ! परंतु “एक रुपयाचं मोल काय असतं हे त्या दिवशी शिकलो “!
आईविषयी लिहिताना लेखक अनेकदा सदगतीत झाल्याशिवाय राहत नाहीत. मित्राविषयी असलेले जिव्हाळा व प्रेम या कादंबरीत पहायला मिळते. ते म्हणतात,’ रवीचा स्वभाव खूप उमदा होता.मैत्रीसाठी जगणारा माणूस मी त्यांच्यात पाहिला.’
आनोसेवाडीत जन्माला आलेले हे पोर, एक दिवस खडतर प्रवास करून उपाशी-तापाशी राहून ग्रामसेवक होते. ही बातमी देण्यासाठी त्यांचे अण्णा मुंबईला त्यांना निरोप द्यायला जातात.त्यावेळी भाजी विकण्याची रिकामी पाटी, तराजू, वजन काटे बाजूला सरकवतात व म्हणतात,’ बापू! आजपासून तुझ्या डोक्यावरची पाटी गेली.’आपले दुःखाचे दिवस सरले तू ग्रामसेवक झाला.’ हे वाक्य ऐकताच अक्षरशः लेखक हंबरडा फोडून अण्णाच्या गळ्यात पडतात. याचवेळी अंधारमय जीवनामध्ये सोनेरी प्रकाशाची पहाट झाल्यासारखी वाटते.
देखणे निर्मितीमूल्य : राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार प्राप्त व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाअंतर्गत पीएच.डी. संशोधनासाठी हेलपाटा कादंबरी आहे. त्यामुळे आजतागायत एकत्रित न मांडलेला मराठी ग्रामीण कादंबरीत अत्यंत प्रामाणिकपणे ग्रामीण गरीबीतील जीवनाचा ते संघर्षातून यश मिळते, असे भाकीत करणारी कादंबरी मैलाचा दगड ठरेल, संदर्भ ग्रंथ ठरेल.
मानवी जीवनातील मूल्यांची परिमाणे, सहानुभाव आणि सकारात्मक भूमिका बाबाराव मडावी यांची पाठराखण बोलके मुखपृष्ठ, मुखपृष्ठावर सकारात्मक भविष्य शोधणाऱ्या वडिलांचा भाव, ठळक प्रिंटींग, आकर्षक साईजची अभिनव कलाकृती असल्याने गरुड भरारी ठरेल, असा आशावाद वाटतो. या पुस्तकाला साहित्य लेखनासाठीचे अनेक पुरस्कार मिळावेत, याच अपेक्षेसह तानाजी धरणे यांना पुढील साहित्यिक प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा.
· कादंबरी : हेलपाटा
· लेखक : तानाजी धरणे
· पाठराखण : बाबाराव मडावी,यवतमाळ
· मुखपृष्ठ : शिरीष घाटे, सोलापूर
· प्रकाशक : पी.आर. ग्रुप ऑफ पब्लिकेशन,वरुड अमरावती
· पृष्ठे : १४४ किंमत : २२५ /- मो. : ९२८४७०७५३२
· परिचय : प्रा.डॉ. दीपक सूर्यवंशी
· शि.म. ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय, कळंब
Leave a Reply