Engage Your Visitors!

‘हिरवं सपन’ कथासंग्रहाला प्रथम पुरस्कार कवी सातपुते यांचा जळगावत उद्या सत्कार

जळगाव – लातूर येथील सुप्रसिद्ध कवी, वात्रटिकाकार, लेखक भारत सातपुते यांच्या मराठी भाषेतील ‘हिरवं सपन’ या कथासंग्रहाला जळगावच्या हिंदी साहित्य गंगा संस्थेचा देशपातळीवरील प्रथम पुरस्कार जाहीर झाला असून उद्या बहुभाषिक साहित्य संमेलनात जळगाव येथे प्रदान केला जाणार आहे अशी माहिती या संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा डॉ. प्रियंका सोनी ‘प्रीत’ यांनी कळवले आहे.डॉ.सुहास गाजरे, दलीचंद्र जैन, माजी मंत्री आ.गिरीश महाजन, जिल्हाधिकारी आदी मान्यवरांच्या उपस्थित हा सत्कार सोहळा आहे. विविध भाषेच्या २०२३ मधील साहित्यकृतींना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

रोखरक्कम ,स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र हे पुरस्काराचे स्वरूप असून जळगाव येथे शनिवार व रविवार असे दोन दिवशीय दहावे बहुभाषिक साहित्य संमेलन संपन्न होत आहे .या संमेलनात मराठी, हिंदी ,गुजरातीसह अनेक भाषेतील मान्यवर साहित्यिक उपस्थित राहणार आहेत .चर्चासत्र, परिसंवाद ,कवीसंमेलन, सांस्कृतिक कार्यक्रम असे संमेलनाचे स्वरूप असून बहुभाषिक कवी संमेलनाचे सूत्रसंचालनही लातूरचे कवी भारत सातपुते हे करणार आहेत.

साहित्याच्या विविध वांग्मय प्रकारात भारत सातपुते यांची पाच डझन पुस्तके प्रकाशित झाली असून कथासंग्रह प्रकारात त्यांची सात पुस्तके प्रकाशित झाली आहेत. हिरवं सपन हा त्यांचा गतवर्षी प्रकाशित झालेला कथासंग्रह आहे. भारत सातपुते यांना आज पर्यंत 67 पुरस्कार लाभले आहेत .

सुप्रसिद्ध उद्योजक कृष्णकुमार गोयल यांचा वाढदिवस शुभेच्छा व काव्यसंग्रह प्रकाशन सोहळ्याने संपन्न

एक वर्षात ३६५ पुस्तक प्रकाशन करण्याचा नक्षत्राचं देणं काव्यमंचचा संकल्पाला काव्यसंग्रह “जंगल गाणी “प्रकाशनानी सुरुवात. नक्षत्राचं देणं काव्यमंच, मुख्यालय, भोसरी, पुणे वतीने संस्थेचे संस्थापक -अध्यक्ष -प्रा. राजेंद्र सोनवणे-कवी वादळकार यांनी सुप्रसिद्ध उद्योजक कृष्णकुमार गोयल यांच्या वाढदिवसानिमित्त संस्थेच्या वतीने अभिनव असा हा रेकॉर्ड होणारा संकल्प केला आहे. याची सुरुवात आज पहिल्या पुस्तकांनी करण्यात आली. पाठ्यपुस्तक कवी उत्तम सदाकाळ यांचा बालकाव्यसंग्रह “जंगल गाणी” कृष्णकुमार गोयल यांच्या शुभहस्ते प्रकाशित करण्यात आला.. यावेळी संस्थेच्या वतीने गोयल यांना डायरी, पुष्पगुच्छ, पुस्तक,शाल देऊन यावेळी गौरवण्यात आले.

याप्रसंगी गोयल म्हणाले की,”माझ्या वाढदिवसाला अनेकांच्या शुभेच्छांचा वर्षाव झाला तसेच संस्थेने सुद्धा माझा गौरव केला. मी सर्वांचे मनापासून आभार मानतो. संस्थेच्या पंचवीस वर्षाच्या वाटचालीमध्ये मी स्वतः साक्षीदार आहे. संस्थेचे कार्य कौतुकास पात्र आहे.”

एका वर्षात 365 पुस्तक प्रकाशित करण्याचा हा अभिनव प्रयोग यशस्वी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यापूर्वी संस्थेने शंभर पुस्तकांचा संकल्प केला होता तो संकल्प पूर्ण केला आहे. वर्षभरात ३६५पुस्तके प्रकाशित झाल्यास. हा लिम्का बुक रेकॉर्डमध्ये किंवा महाराष्ट्र बुक रेकॉर्ड नोंद होणारा उपक्रम असेल अशी या निमित्त भावना व्यक्त करण्यात आली. 

यापूर्वी संस्थेच्या वतीने संस्थेच्या २४व्या वर्धापन दिनानिमित्त एकाच वेळी २४ पुस्तकांचे प्रकाशन करून महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डमध्ये संस्थेच्या कामाची नोंद झाली आहे. याचा अभिमान वाटत आहे. साहित्य व काव्य क्षेत्रामध्ये वेगवेगळे उपक्रम करून संस्थेने आपल्या कामाची नोंद जनसामान्यांमध्ये केली आहे. भारतातील अभिनव असं “कवींचे कॅलेंडर “प्रकाशन करून सुद्धा संस्थेने आपल्या कामाची मोहर उमटवली आहे.

गेले सातत्यपूर्ण २५ वर्ष काम करणारी ही महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील जगातील एकमेव अशी कार्यक्षम संस्था आहे. हजारो कवींना घडवणारे हे एक हक्काचं आणि सन्मानाचे व्यासपीठ आहे. या रेकॉर्डमध्ये पुस्तक प्रकाशनाच्या उपक्रमात ज्या कवींना आपल्या काव्यसंग्रह, कथासंग्रह ,कादंबरी अथवा इतर साहित्य प्रकाशित करायची इच्छा असेल ,त्यांनी संस्थेच्या अनुदान योजनेचा फायदा घेऊन या ३६५ पुस्तकांमध्ये आपल्या पुस्तकाची वर्णी लावून. या रेकॉर्डमय उपक्रमात सहभागी व्हावे. अशी संस्थेच्या वतीने संपूर्ण साहित्य विश्वातील साहित्यिकांना व कवींना यानिमित्ताने आवाहान करण्यात आले आहे. असा आगळावेगळा उपक्रम राबवणारा हा एकमेव कायमचे आहे. 

आत्तापर्यंत प्रकाशित केलेल्या प्रत्येक पुस्तकास पुरस्कार प्राप्त झाले आहेत. दर्जेदार पुस्तक वाचकांना मिळावी तसेच दर्जेदार पुस्तकाची निर्मिती व्हावी. यासाठी आकर्षक मुखपृष्ठ परफेक्ट बांधणी, आयएसबीएन नंबर तसेच उत्तम कॉलिटी चा पेपर वापरून .सर्व पुस्तक निर्मिती करून कवी व साहित्यिकांच्या घरी टपाल खर्च न घेता विनामूल्य घरपोच पाठवण्यात येतात.

साहित्यिकांनी आपलं साहित्य मोबाईल टायपिंग अथवा बाय पोस्ट पाठवावे. त्यासाठी पुढील नंबर वर 9272156295संपर्क तसेच साहित्य पाठवण्यासाठी-आजच पुस्तक प्रकाशनाचा निर्णय घ्या. अशी माहिती राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.राजेंद्र सोनवणे यांनी एका पत्रकाद्वारे कळवली आहे.

डोंबिवली ग्रंथसंग्रहालयाचा “ध्यास ” दीपावली अंकाचा प्रकाशन सोहळा संपन्न*

 डोंबिवली ग्रंथसंग्रहालयाचा “ध्यास ” दीपावली अंकाचा प्रकाशन सोहळा 24.11.2024 रोजी सायंकाळी 4.30 वाजता संपन्न झाला. कार्यक्रमाचा शुभारंभ दीप प्रज्वलन व ईश्वर स्मरणाने झाला. संपादिका/सूत्र संचालिका शितल दिवेकर यांनी प्रमुख पाहुणे श्री नागेश हुलवळे व सर्व उपस्थितांचे स्वागत केले.त्यांनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणून सर्वांचे अभिनंदन केले. प्रमुख पाहुण्यांना व संस्थेच्या पदाधिकार्यानां व्यासपीठावर स्थानापन्न होण्याची विनंती केली.

सचिवांनी पुष्पगुच्छ व स्मृती चिन्ह देऊन पाहुण्यांचे स्वागत केले.अध्यक्ष सतिश कुलकर्णी यांनी अंकासंबंधित मेहनतीबद्दल सांगितले व संपादिकेचे कौतुक केले. दिवेकर मॅडमनी प्रमुख पाहुण्यांची ओळख व त्यांच्या कार्यक्षेत्राबद्दल माहिती दिली. मुखपृष्ठाच्या संकल्पनेला श्री जोशी,श्री कोर्डे व त्या स्वतः यांनी खूप शोध घेऊन मुर्तरूपात घडवले.तो प्रवास व त्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला.

अंकातले सर्व लेखकवर्गाचे अभिनंदन केले व आभार मानले. मग प्रमुख पाहुण्यांना त्यांचे विचार व्यक्त करायची विनंती केली. श्री नागेशजींनी अंकाची वैशिष्ट्ये इतकी सविस्तर सांगितली की अंक वाचनाचा उत्साह द्विगुणित झाला. त्यांनी एका दिवसाच्या अल्प अवधीत केलेली अंकाची सुंदर मिमांसा कौतुकास्पद आहे. प्रत्येक लेखाबद्दलचे विचार त्यांनी मांडले.ते पुढे बोलले की मुखपृष्ठ खूप रेखीव व ठळक आहे. त्यात समाविष्ट शिलालेख, माऊली, चक्रधर स्वामी, गर्जतो मराठी, संस्थेचा लोगो व भरारी घेत असलेले तीन पक्षी ह्या सर्वांची जर व्याख्या केली तर एक पूर्ण ग्रंथाची रचना होऊ शकते.भरारी घेणारे पक्षी दर्शवतात वैचारिक स्वतंत्रता आणि त्याचे उत्तम उदाहरण आहे हा ध्यास अंक.

मग त्यांनी अंकात प्रकाशित आपली कविता प्रस्तुत केली.सर्व लेखकांचे कौतुक, अति उत्तम संपादन व संस्थेचे आभार व्यक्त करुन त्यांनी आपले वक्तव्य संपवले. सचिव गीता रीठाल यांनी संस्थेची स्थापना,आता पर्यंतची वाटचाल, उद्दिष्टे व पुढच्या उपक्रम याबद्दल माहिती दिली. सर्व देणगीदारांचे आभार मानले.तसेच उपस्थित लोकांना संस्थेच्या पुढच्या प्रगतीसाठी देणगी देण्यासाठी आवाहन केले. त्यांनी सर्व लेखक वर्ग, संपादिका व प्रमुख पाहुण्यांना धन्यवाद दिले.

सर्व उपस्थित लेखकांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. सर्व लोकांना धन्यवाद देऊन संचालिकांनी कार्यक्रमाची सांगता केली. सूत्रसंचालन अति सुंदर झाले. त्याने कार्यक्रमाला एक आगळा वेगळा रंग दिला.

कांदिवली मध्ये धनगर समाज विकास मंडळाचे स्नेहसंमेलन वधू वर परिचय मेळावा व सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात जल्लोषात संपन्न

भारत कवितके मुंबई, कांदिवली पश्चिम

रविवार दिनांक २४ नोव्हेंबर २०२४ रोजी दुपारी ४ ते रात्री १० वाजेपर्यंत कांदिवली येथील वांजा ज्ञाती युवक मंडळ सभागृह, इराणी वाडी रोड नंबर १,धनामल शाळेसमोर मुंबई ६७ या ठिकाणी धनगर समाज बांधवांचा स्नेहसंमेलन, वधू वर परिचय मेळावा,व सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात जल्लोषात आनंदात साजरा करण्यात आला.सुरुवातीला धनगर समाज विकास मंडळाच्या सर्व आजी माजी पदाधिकारी यांचे हस्ते दीप प्रज्वलन करून पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.धनगर समाज विकास मंडळाचे संस्थापक सदस्य व प्रवक्ते, जेष्ठ पत्रकार, कवी, लेखक, गीतकार, सामाजिक कार्यकर्ता भारत कवितके यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले की,” समाज हिताच्या योजना राबविणे,१०वी,१२वी नंतर कोणती दिशा निवडायची यावर मान्यवरांचे मार्गदर्शन करणे, समाज एक संघ ठेवून समाज बांधवांची आर्थिक शैक्षणिक व इतर क्षेत्रात प्रगती साधणे,या उद्देशाने १९ वर्षांपूर्वी या धनगर समाज विकास मंडळाची स्थापना करण्यात आली होती.

दरवर्षी होणाऱ्या स्नेहसंमेलन वधू वर परिचय मेळावा व सांस्कृतिक कार्यक्रमात विभागातील धनगर समाज बांधव, भगिनी,मुले मुली, जेष्ठ नागरिक, मंडळाचे पदाधिकारी यांनी मोठ्या उत्साहात जल्लोषात व आनंदाने यामध्ये सहभागी होतात, मंडळाचे कार्य अतिशय प्रशंसनीय, प्रोत्साहन देणारे, प्रगती पथावर नेणारे असून मंडळातील पदाधिकारी कोणत्याही प्रसिद्धीची लालसा न बाळगता समाज हिताच्या कामासाठी रात्र दिवस झटत असताना दिसतात.समाजातील महिला वर्ग हळदी कुंकू,सण, उत्सव एकत्र येऊन मोठ्या प्रमाणात साजरा करतात,” या नंतर वधू वर परिचय मेळावा घेण्यात आला त्याचे सूत्र संचालन अजित चांगण यांनी केले, वधू वर यांनी व्यासपीठावर येऊन आपला परिचय दिला.

धनगर समाजातील गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनीचा विशेष गुणवत्ता प्राप्त मुला मुलींना, समाज बांधवांना, जेष्ठ नागरिकांना पुष्पगुच्छ व भेट वस्तू देऊन सन्मानित करण्यात आले,या वेळी सदानंद लाळगे, संतोष पिसे, आणि मंडळ अध्यक्ष शिवाजी पिसे यांनी समाज बांधवांना अमूल्य, महत्वपूर्ण मार्गदर्शन केले.सांस्कृतिक कार्यक्रमात लहान मुले मुलीनी वेगवेगळ्या गाण्यावर नृत्य करुन उपस्थित असलेल्यांची मने जिंकली, काही महिला भगिनीं भावगीत, लावणी म्हटली, सांस्कृतिक कार्यक्रमांचे सूत्रसंचालन उज्वला लाळगे, लक्ष्मी लाळगे, नयना चांगण यांनी केले तर सत्कार प्रसंगी विशाल पिसे, संतोष पिसे,व सदानंद लाळगे यांनी सूत्रसंचालन केले.मल्हारी लाळगे, आप्पासाहेब कुचेकर, सदानंद लाळगे, संतोष पिसे, भारत कवितके, शिवाजी पिसे, सुनिल भगत, नारायण पिसे, अजित चांगण, महेंद्र काळे, मनोज पिसे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सागर पिसे, मधुकर कुचेकर, बाळासाहेब पिसे, राजेश कुचेकर, सतिश पिसे यांनी विशेष परिश्रम घेतले.

कार्तिकी पायवारी श्री क्षेत्र पंढरपूर ते श्री क्षेत्र आळंदी पायवारी दिवे घाटातील काही क्षणचित्रे

भारत कवितके मुंबई, कांदिवली पश्चिम

मंगळवार दिनांक १२ नोव्हेंबर २०२४ रोजी श्री क्षेत्र पंढरपूर येथील कार्तिकी एकादशी दिवशी कार्तिकी यात्रा मोठ्या प्रमाणात भरते, त्या यात्रेची सांगता शुक्रवार दिनांक १५ नोव्हेंबर २०२४ रोजी गोपाळपूर येथील पौर्णिमेच्या काल्याने संपन्न झाली.आणि त्याच दिवशी श्री क्षेत्र पंढरपूर हून श्री क्षेत्र आळंदी कडे वारकऱ्यांची पायवारी सुरू झाली.श्रीक्षेत्र पंढरपूर भंडीशेगांव,तोंडले बोंडले, वेळापूर,खुडूस,पुरंदावडे शाळा, नातेपुते, धर्म पुरी,बरड पेट्रोल पंप,विडवणी,निबोरे, तरडगाव,निरा कनल,कामटवाडी, जेजुरी,सासवड मळा, सासवड, दिवे घाट,वडकीनाका, हडपसर, विश्रांतवाडी, आणि श्री क्षेत्र आळंदी असा कार्तिकी पायवारीचा प्रवास सालाबादप्रमाणे यंदाही संपन्न होत आहे.

मंगळवार दिनांक २६ नोव्हेंबर २०२४ रोजी माऊलीच्या श्रीक्षेत्र आळंदी येथे मोठी कार्तिकी यात्रा भरत आहे.या पंढरपूर ते आळंदी पायवारीत श्री.सद् गुरु वै.ह.भ.प.आप्पासाहेब वासकर महाराज फड या मधील वारकरी बांधव मोठ्या प्रमाणात सहभागी झालेले होते.या फडा मध्ये मुंबई कांदिवली येथील धनगर समाज विकास मंडळातील जवळजवळ ३५ ते ४० वारकरी बांधव सहभागी झाले आहेत.अभंग, गौळण,भारुड टाळ मृदुंग सोबत वारकरी गात वाजवत तल्लीन होऊन देहभान विसरून पायवारीत सहभागी झाले होते.

आमचे मुंबई प्रतिनिधी गीतकार भारत कवितके यांच्या लेखणीतून साकारलेले ” आठव आठव राणी…” प्रेम गीत युट्यूबवर रसिकांच्या भेटीला

आमचे मुंबई प्रतिनिधी गीतकार भारत कवितके यांच्या दमदार,सकस लेखणीतून साकारलेले” आठव आठव राणी..” हे प्रेम गीत युट्यूबवर रसिकांच्या भेटीला नुकतेच प्रसारित झाले आहे.अगदी थोड्या अवधीत या प्रेम गीताने रसिकांना मंत्रमुग्ध केले आहे.तरुणाच्या गळ्यातील ताईत बनलेले हे गीत वृध्दांना ही आपल्या तरुण वयातील आठवणी जाग्या करून जातात.

आठवणी ताज्या टवटवीत होतात.पीपी म्युझिक प्रेझेंट कंपनी व्दारा निर्माते श्रीराम घडे, गीतकार आमचे मुंबई प्रतिनिधी भारत कवितके, गायक विकास साळवे, संगीत चंदन कांबळे, आणि विशेष सहाय्य गौतम पुंडे,व प्रमोद सूर्यवंशी या सर्वांच्या परिश्रमाने हे गीत प्रेक्षणीय, श्रवणीय झाले आहे.छायाचित्रण, संगीत, शब्द,ताल,सूर, सादरीकरण सर्व बाजूंनी या गाण्याने रसिक मनाला भुरळ घातली आहे.भारत कवितके यांनी आपल्या वयाच्या ६५ व्या वर्षी हे प्रेम गीत लिहून आपल्या लेखणीचा चमत्कार दाखविला आहे.

भेटीचे बहाणे,नकारात होकार देणे, मंदिरात एकटीने जाणे,अंगास बिलगणे, लटक्या रागाने दूर जाणे, सुखासाठी नवस करणे, हुंकार प्रश्नांचे, पावसात चिंब चिंब भिजणे, वगैरे वगैरे शब्द प्रयोगामुळे तरुणां बरोबर वृद्धांच्या काळजाची धडधड वाढते.पावसात तरुणीचे बेधुंद, बेहोश होऊन नाचणे, तरुणीचे रोज नवे नवे बहाणे, गृहिणी चा साज शृंगार, या सर्व गोष्टी रसिकांना भुरळ पाडतात, एकंदरीत गीतकार भारत कवितके यांचे ” आठव आठव राणी..” हे प्रेम गीत रसिकांच्या पसंतीला उतरले असल्याचे रसिकांनी आपल्या प्रतिक्रिया मधून दिल्या आहेत.

 

अमरावतीच्या सौरभ अभ्यंकरने ‘मोरया’ गाण्याने ‘भूमी’ प्रोजेक्टमध्ये दिला धमाका

अमरावती शहरातील बिच्छू टेकडी या झोपडपट्टीतील सौरभ अभ्यंकर हा आपल्या अमरावतीचे नाव आपल्या रॅप संगीताच्या माध्यमातून पूर्ण भारतभर उंचवत असताना त्यांनी आणखी एक दिग्गज संगीतकार जोडी सोबत म्हणजे सलीम सुलेमान यांच्यासोबत “भूमी” या संगीत प्रोजेक्टमध्ये काम केले आहे या प्रोजेक्टमध्ये भारतातील नव्हे तर जगभरातील दिग्गज व सुप्रसिद्ध गायक संगीतकार आहेत जसे की सोनू निगम, श्रेया घोषाल सुनिधी चौहान, विशाल दादलानी इत्यादी या सोबतच लॉरेन अलर्ड, टेलर जॉन्स असे जगप्रसिद्ध असलेले गायक या प्रोजेक्टमध्ये आहे.

या नवीन गाण्यासाठी म्हणजेच “भूमी” या प्रोजेक्ट मधील “मोरया” या गाण्यांमध्ये “कोंबडी पळाली” व “ऐका दाजीबा” फेम वैशाली सामंत व हिंदी सिनेसृष्टी मध्ये हीप-हॉप संगीतने धूम करणारे करण कंचन व आपला अमरावतीचा सौरभ अभ्यंकर यांनी मिळून गणपतीच्या गाण्याने सुरुवात करत “भूमी” या प्रोजेक्टच्या शुभारंभ केला. सोबतच या गाण्याच्या व्हिडिओमध्ये लाईट डिझायनिंग चे काम अमरावती मधीलच अजय इंगळे व रोहित वगारे यांनी केले आहे हे गाणे सलीम सुलेमान यांच्या “you tube” चैनल वर प्रसिद्ध करण्यात आले आहे. हे गाणे सोशल मिडीयावर ट्रेंडीगवर सुरु आहे.

या गाण्याचे प्रमोशनसाठी कलर्स मराठी या चॅनेलवर सुरू असलेल्या बिग-बॉस मराठी या शोमध्ये सिने अभिनेत्री रितेश देशमुख सूत्रसंचालन करीत असताना त्यांनी सलीम मर्चेंट, करण कंचन व सौरभ अभ्यंकर यांना गाण्याचे सादरीकरण करण्यासाठी आमंत्रित केले होते. सौरभ अभ्यंकर हा आपल्या रॅप संगीताने पूर्ण भारतभर प्रसिद्ध आहे त्यांनी आपल्या रॅपद्वारे सामाजिक मुद्यावर आवाज उचलून लोकांमध्ये जागृती पसरवली आहे व लोकांच्या मनामध्ये आपली वेगळी जागा निर्माण केली. त्याने आपला रॅप हिंदी चित्रपट ‘गली बॉय” यामध्ये सादर करून बॉलीवूडमध्ये एन्ट्री केली त्यानंतर त्याने नागराज मंजुळे यांच्या “झुंड” या चित्रपटात अभिनय करून रॅप सुद्धा सादर केला व त्यानंतर “हसल” या रॅप शो मध्ये अंतिम फेरीपर्यंत जाऊन “ओ.जी. हसलर ट्रॉफी” जिंकली व आपल्या गौरवाने आणि बिच्छू टेकडी झोपडपट्टीचे, अमरावतीचे व महाराष्ट्राचे नाव लौकिक केले.

या त्याच्या नवीन गाण्यासाठी सगळी कडून सौरभचे अभिनंदन व कौतुक होत आहे. सोबतच त्याला पुढील उज्वल भविष्यासाठी परिवाराकडून मित्राकडून व अमरावती मधील नागरिकांकडून शुभेच्छा दिल्या जात आहे.