Engage Your Visitors!

कविता:-“निवडणूक आणि मतदान”

विकास न परिवर्तनाचा माजला गदारोळ ।

सर्वांगीण भरभराट नुसताच शब्द कल्लोळ ।।

दशकानूदशके केला गरीब जनतेचा बट्याबोळ ।

तरीही आम्हीच कसे श्रेष्ठ सांगणार सरळ ।।

उन्नतीसाठी झाले सुसज्ज घेऊन हाती ढाल ।

भले भले गळाठले परजता तयांवर तलवार ।।

वरवरची आश्वासने नेहमीच पोकळ ।

त्यावरच तर नामर्दांचा काळ सोकावेल ।।

सत्तेसाठी नात्यात अराजकता माजेल ।

तरीही निश्चयाचा महामेरू उभा निश्चल ।।

हिच आहे आणीबाणीची जाणूया वेळ ।

ठाम उभे राहून घालू परिस्थितीचा मेळ ।।

दलबदलू लोकांनी घातला आहे घोळ ।

पुर्व संचिताच्या पुण्याइचे असावे पाठबळ ।।

नाही हातभार, तर नको अविश्वास, इच्छा प्रबळ।

जमेल तितके ,जमेल तशी, देऊ मदत सबळ ।।

सत्यतेच्या कसोटीवर सुराज्य मनी इच्छा सकल।

मतदारराजा स्थापू रामराज्य ,प्रगतीपथा चल ।।

 

(स्वरचित)

©® नीला चित्रे

चिंचवड पुणे 

 

संगीत, शायरी आणि संवाद यांची एक उत्स्फूर्त मैफिल

प्राधिकरण -येथे ग दि माडगूळकर नाट्यगृह सुरू झाल्यानंतर काव्य, नाट्य, नृत्य, एकांकिका सतत सुरू झाल्याने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नागरिकांची सांस्कृतिक भूक भागली. तरुणाईला व्यासपीठ उपलब्ध झाले.

ग. दि. माडगूळकर सभागृह निगडी येथे नुकत्याच झालेल्या माहौल ह्या कार्यक्रमात संगीत, शायरी, संवाद यांची उत्स्फूर्त मैफिल दिनांक १३ नोव्हेंबर ला संपन्न झाली.अभिनेता तेजस बर्वे तसेच अभिनेते डॉ. संजीवकुमार हे देखील यावेळी उपस्थित होते.

” माहौल” संगीत शायरी आणि संवाद यांची एक उत्स्फूर्त मैफिल ही संकल्पना चिंचवड चे तरूण कलाकार सौरभ चव्हाण यांची असून गायक पलाश बोरकर, सौरभ चव्हाण यांना गिटार आणि वोकल्स ची साथ गणेश शीलवंत तर तबला आणि क्लॅपबॉक्स प्रसाद गुरव यांनी दिली. संकल्पनेतील संवाद केतकी चव्हाण यांनी खुलविले.

“सय्योनी”, “छोड आयें हम वों गलियाँ”, “लागा चुनरी मे दांग”, “मेरे रश्के कमर”, “मेरे मेहेबूब कयामत होगी”, “जो तुम मेरे हो” आदि गीतांना रसिकांची पसंती मिळाली. पिंपरी, चिंचवड, प्राधिकरण, निगडी मधील संगीत रसिकांची उपस्थिती लक्षणीय होती.

 

 

आठव्या अखिल भारतीय मराठी नक्षत्र महाकाव्य संमेलनाच्या आयोजनाची घोषणा रायगडावर 

नक्षत्राचं देणं काव्यमंच ,मुख्यालय ,पुणे ३९ च्या वतीने कवींसाठी वेगळे उपक्रम राबवले जातात .यावेळी रायगड किल्ला नक्षत्र काव्य सहल आयोजित करण्यात आली होती. तसेच संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आठवे अखिल भारतीय मराठी नक्षत्र महाकाव्यसंमेलनाचे आयोजन दि.१७ व दि.१८ मे २०२५रोजी पिंपरी चिंचवड कवितेच्या राजधानी मध्ये आयोजन करण्याची रायगडावर घोषणा करण्यात आली. तसेच या महाकाव्यसंमेलन महाकाव्यसंमेलन अध्यक्ष म्हणून बोल्ड कवी म.भा.चव्हाण,पुणे यांची सुद्धा निवड यावेळी करण्यात आली . त्यांच्या निवडीचे पत्र त्यांना याप्रसंगी देण्यात आले.

तसेच “भारतरत्न रमाई” महाकाव्यग्रंथाचे सुद्धा प्रकाशन करण्यात आले. तसेच कवी नवनाथ पोपळे यांच्या “बापाची सावली” या काव्यसंग्रहाचे प्रकाशित करण्यात आले. साईराजे पब्लिकेशन ,पुणे यांच्यावतीने एका वर्षात ३६५ पुस्तके प्रकाशनचा संकल्प रायगडाच्या साक्षीने करण्यात आला.

याप्रसंगी कवी म. भा. चव्हाण म्हणाले की,”पंचवीस वर्ष काव्य क्षेत्रात सातत्यपूर्ण काम करणारी महाराष्ट्रातील एकमेव अशी नक्षत्राचं देणं काव्यमंच संस्था आहे. विविध कवितेचे प्रयोग करणारी एक क्रियाशील संस्था आहे. या संस्थेने माझी ८ व्या अखिल भारतीय मराठी नक्षत्र महाकाव्यसंमेलन अध्यक्षपदी निवड केल्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानत आहे. रायगडाच्या साक्षीने सर्वांच्या लेखणीला आणि जीवनाला एक ऊर्जा मिळाली आहे. महाराष्ट्राचं दैवत असलेले श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचा गौरव करणारा सोहळा व माय मराठीचा गौरव होणारा हा सोहळा आज रायगडावर संपन्न झाला. भविष्यामध्ये महाराष्ट्राची अस्मिता व माय मराठी सेवा आपल्या सर्वांच्या हातातून घडू हीच या निमित्ताने अपेक्षा व्यक्त करतो.”

ये, शेर शिवा, समशेर शिवा

शिवनेर शिवा,रणभेर शिवा

औफेर शिवा, चौफेर शिवा

साक्ष भीमेचे पाणी देईल,

महाराष्ट्र माझा

सह्याद्रीचा पुत्र शिवाजी

रयतेचा राजा

यावेळी नरवीर तानाजी मालुसरे यांच्या वंशज प्रा. डॉ. शितल मालुसरे यांनी या ठिकाणी या काव्य सहली सहभाग घेऊन आपल्या धारदारचनांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. शूरवीर तानाजी मालुसरे आणि छत्रपती शिवराय यांच्या अनेक प्रसंगाला त्यांनी उजाळा दिला. अशा उपक्रमाने संस्थेच्या माध्यमातून समाज प्रबोधनाची व जीवनातील विविध बदलांची भूमिका आपल्याला लक्षात येते.

पूर्वजांचा आशीर्वादाला,

जे कार्यकर्तृत्वाची जोड

शोभला पाहिजेस वंशज

हाच एक संकल्प रोड

रायगडावर नक्षत्र काव्य मैफल.. छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करून ,आपल्या विविध काव्यरचना बहारदार सादर केल्या.रायगडावर काव्य जागर करून नक्षत्राचं देणं कायमंचच्या वतीने अभिनव असा उपक्रम घेण्यात आला होता.यावेळी बोर्ड कवी म. भा.चव्हाण पुणे, कवी वादळकार भोसरी,नरवीर तानाजी मालुसरे यांच्या वंशज प्रा. शितल मालुसरे, हभप. डॉ. रवींद्र सोमवंशी आणि नवनाथ पोकळे दिलीप विधाटे , ज्ञानेश्वर वायकर, सौ प्रीती सोनवणे, सौ रुपाली भालेराव, साजिद मोमीन,बबन चव्हाण, अशोक सोनवणे, काळूराम शिंदे, नेहा भालेराव, संगीता सोनवणे, प्रसाद भागवत, रवी माळी, जुली यादव तसेच शिवप्रेमी इ.नी यात सहभागी घेतला.

राजमाता जिजाऊ यांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेऊन सर्व नक्षत्र रायगडाकडे रवाना झाली. महाराजांना मुजरा करीत काव्यसंग्रह प्रकाशन सोहळा तसेच काव्याचा जागर करण्यात आला.मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आहे.याचे अभिवादन करण्यासाठी रायगडावर नक्षत्र गेली होती.माय मराठीचा जागर करण्याचा प्रयत्न केला.रायगडाचे दर्शन म्हणजे मराठीची अस्मिता जागृत होय.

तसेच महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून, महाराजांच्या समाधीचे दर्शन घेण्यात आले. रायगडाच्या विविध वास्तूंचे मार्गदर्शन तेथील स्थानिक गाईडने केले. रायगडाची भव्यता आणि रायगडावरचे ऊर्जा मनात साठवत सर्व नक्षत्र परतीच्या प्रवासाला निघाली. सर्व कवींची “रायगड किल्ला बहारदार काव्य मैफल “आपल्या रचनातून संपन्न केली.अशी माहिती संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. राजेंद्र सोनवणे यांनी दिली.

कविता- “कालचक्र”

 ” कालचक्र”

 

 काट्यामागे काटे पळती 

फिरते कसे हे कालचक्र 

क्षणामागे हे क्षण धावती 

हेच आहे जीवनचक्र 

 

सुखदुःखाचा लपंडाव हा 

चालत असतो या चक्रात

 दिसामागून दिस जाती 

आणि सांगता होई मासात

 

 प्रत्येक दिवस देऊन जाई

 एक आठवण त्या दिवसाची

 हिच पुंजी आहे रे 

तुझ्या शेवटच्या श्वासाची 

 

काय गेले काय उरले?

कसला हिशोब करतो रे 

सारे काही असूनही 

शेवटी शून्यच उरतो रे 

 

म्हणून सांगतो मी गड्या रे 

जगून घे येणारा क्षण 

देऊन जा दुसऱ्याला काही 

सदैव करतील तुझे स्मरण 

 

हिच किमया या काळाची 

जी सतत निरंतर सुरू आहे 

काळ कुणासाठी थांबत नाही 

हेच अंतिम सत्य आहे 

   

मेघा भांडारकर, भंडारा 

मो. नं. 8007166671

केसांत माळूनिया मराठी कविता

केसांत माळूनिया

 

केसांत माळूनीया गजरा

 फिरवीते सर्वांवर नजरा

लावण्यवती अहो अप्सरा

गिरकी घेतसे गरा गरा

 

केसांत माळूनिया गजरा

ठुमकत चाली भराभरा‌

चैतन्य आणते चराचरा

याैवनाचा दाखवी नखरा

 

केसांत माळूनिया गजरा‌

आनंद प्रीतीचा देई खरा

स्वभाव अजब हा गहरा

मूर्च्छा येतसे तरुण पोरां

 

केसांत माळूनिया गजरा

पदर सरकवी सरासरा

जीव हेातो घाबरा घाबरा

गगनाला मिठी मारे धरा

                                  

  कवी. संजय मुकूंदराव निकम, मालेगाव जि.नाशिक.

कलारंजन न्यूज तर्फे आयोजित दिवाळी काव्य स्पर्धा, शिर्षक- दिवाळी पर्व

कलारंजन न्यूज तर्फे आयोजित दिवाळी काव्य स्पर्धा

शिर्षक: दिवाळी पर्व

 

दिवाळीच्या शुभ पर्वावर

बंधुत्वाचा मनदीप लावू

स्नेहा च्या शब्द फुलांनी

परस्परांचे जिवन सजवू 

परीसर अपुला मनही अपुले

मार्ग धरू या स्वच्छतेचा

स्वता जळून प्रकाश देई

आदर्श घेऊन पणतीचा 

दारी ताेरण हार फुलांचे

सुगंध प्रसवी प्रसन्नतेचा

तया पाहता माेद मिळताे

क्षण भाेगा आनंदाचा 

नाती गाेती सारे जमती

स्वाद जिभेवर मिष्ठांनाचा

द्वेष मनातील फेकून देवू

आनंद घेऊ या दिवाळीचा 

थाेर संस्कृती भाव आगळे

सन्मान राखू धनधान्याचा

धन्वंतरी गणेश अन् लक्ष्मी

करी उध्दार मानव जातीचा 

 

✒️ कवी प्रदीप हेमके

कलारंजन न्यूज तर्फे आयोजित दिवाळी काव्य स्पर्धा, शीर्षक – पाडवा प्रतिक प्रेमाचे

कलारंजन न्यूज तर्फे आयोजित दिवाळी काव्य स्पर्धा 

शीर्षक – पाडवा प्रतिक प्रेमाचे

 

उटण्याचा मंत्रमुग्ध सुगंध 

घेऊन आला पाडवा

प्रेमाच्या नात्याने उजळून

निघाला दिवाळी पाडवा!

 

अंगणी रांगोळीच्या रंगांची उधळण

दारी पणतीच्या दिव्यांची आरास

आकाश कंदीलाच्या रोषणाईचा साज

सर्वत्र पसरे आनंद बरसात खास!

 

पतिला औक्षण करुन

साजरा करावा पाडवा

प्रेमाच्या नात्यात गुंफून

उभयंतातील वाढेल गोडवा!

 

तेजोमय प्रकाश पडावा

नवरा – बायकोच्या जीवनी

प्रेमाची गोडी वाढावी

शतजन्माच्या नात्यानी!

 

✒️कवयित्री श्वेता कुलकर्णी

शब्दस्वरूप साहित्य मंच येथील राज्यस्तरीय कवी संमेलनात अॅड. उमाकांत आदमाने करणार सूत्रसंचालन

छत्रपती संभाजीनगर प्रतिष्टान संचलित शब्दस्वरूप साहित्य मंच येथील श्री. श्रुंगेरी देवी चौथे राज्यस्तरीय कवी संमेलनात अॅड. उमाकांत आदमाने (नोटरी, भारत सरकार) करणार सूत्रसंचालन

छत्रपती संभाजीनगर प्रतिष्टान संचलित शब्दस्वरूप साहित्य मंच व सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त श्री. श्रुंगेरी देवी काव्योत्सव वर्ष चौथे वार सोमवार दि. ४ नोव्हेंबर २०२४ रोजी होणा-या राज्यस्तरीय कवी संमेलनात पुणे येथील कवी, साहित्यिक, निवेदक मा. अॅड. उमाकांत मधुकर आदमाने (नोटरी, भारत सरकार) सुत्रसंचालन करणार आहेत, छत्रपती संभाजीनगर येथे होणा-या राज्यस्तरीय कवी संमेलनात मा. सुनिल डोके, (ग्रामीण कवी, लेखक, समीक्षक) संमेलनाध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत ,उद्घाटक : मा. रज्जाक शेख (कवी, गझलकार, लेखक) विशेष अतिथी म्हणून मा. अशोक गायकवाड (प्रसिद्ध कवी शेतीमातीकार), मा. प्रकाश पाठक (कवी, लेखक), मा.सौ.निशा महेश कापडे (कवयित्री, लेखिका, प्राथमिक पदवीधर शिक्षिका), मा.विजयकुमार पांचाळ (कवी, लेखक, गुणवंत कामगार) अशी माहिती संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा मा.सौ.पूजा राजेश घोंगडे व निमंत्रक / आयोजक / संयोजक मा. ज्ञानेश्वर काळे यांनी जाहीर केले.

छत्रपती संभाजीनगर प्रतिष्टान संचलित शब्दस्वरूप साहित्य मंचाच्या वतीने सौ. पूजा घोंगडे यांचे बंधु ज्ञानेश्वर काळे यांच्या ग्रामदेवतेच्या नावाने श्री. श्रुंगेरी देवी दीपावली विशेषाकांचे प्रकाशना या संस्थेच्या माध्यामातून सर्व मान्यवरांच्या हसेत केले जाणार आहे अशी माहिती संस्थेच्या संस्थापंक अध्यक्षा मा. सौ. पूजा राजेश घोंगडे व व निमंत्रक / आयोजक / संयोजक मा. ज्ञानेश्वर काळे यांनी दिली. पुणे येथील कवी, साहित्यिक, निवेदक मा. अॅड. उमाकांत आदमाने (नोटरी, भारत सरकार) यांनी या अगोदर अनेक जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्तरावर निवेदकाची भूमिका बजावत कवी प्रेमींना आपल्या आवाजाच्या जादूने मंत्रमुग्ध केलेले आहे, आता देखील छत्रपती संभाजीनगर येथील होणा-या चौथ्या राज्यस्तरीय कवी संमेलनात त्यांचा उत्स्फूर्त सहभाग असणार आहे.