Engage Your Visitors!

कांदिवली मध्ये धनगर समाज विकास मंडळाचे स्नेहसंमेलन वधू वर परिचय मेळावा व सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात जल्लोषात संपन्न

भारत कवितके मुंबई, कांदिवली पश्चिम

रविवार दिनांक २४ नोव्हेंबर २०२४ रोजी दुपारी ४ ते रात्री १० वाजेपर्यंत कांदिवली येथील वांजा ज्ञाती युवक मंडळ सभागृह, इराणी वाडी रोड नंबर १,धनामल शाळेसमोर मुंबई ६७ या ठिकाणी धनगर समाज बांधवांचा स्नेहसंमेलन, वधू वर परिचय मेळावा,व सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात जल्लोषात आनंदात साजरा करण्यात आला.सुरुवातीला धनगर समाज विकास मंडळाच्या सर्व आजी माजी पदाधिकारी यांचे हस्ते दीप प्रज्वलन करून पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.धनगर समाज विकास मंडळाचे संस्थापक सदस्य व प्रवक्ते, जेष्ठ पत्रकार, कवी, लेखक, गीतकार, सामाजिक कार्यकर्ता भारत कवितके यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले की,” समाज हिताच्या योजना राबविणे,१०वी,१२वी नंतर कोणती दिशा निवडायची यावर मान्यवरांचे मार्गदर्शन करणे, समाज एक संघ ठेवून समाज बांधवांची आर्थिक शैक्षणिक व इतर क्षेत्रात प्रगती साधणे,या उद्देशाने १९ वर्षांपूर्वी या धनगर समाज विकास मंडळाची स्थापना करण्यात आली होती.

दरवर्षी होणाऱ्या स्नेहसंमेलन वधू वर परिचय मेळावा व सांस्कृतिक कार्यक्रमात विभागातील धनगर समाज बांधव, भगिनी,मुले मुली, जेष्ठ नागरिक, मंडळाचे पदाधिकारी यांनी मोठ्या उत्साहात जल्लोषात व आनंदाने यामध्ये सहभागी होतात, मंडळाचे कार्य अतिशय प्रशंसनीय, प्रोत्साहन देणारे, प्रगती पथावर नेणारे असून मंडळातील पदाधिकारी कोणत्याही प्रसिद्धीची लालसा न बाळगता समाज हिताच्या कामासाठी रात्र दिवस झटत असताना दिसतात.समाजातील महिला वर्ग हळदी कुंकू,सण, उत्सव एकत्र येऊन मोठ्या प्रमाणात साजरा करतात,” या नंतर वधू वर परिचय मेळावा घेण्यात आला त्याचे सूत्र संचालन अजित चांगण यांनी केले, वधू वर यांनी व्यासपीठावर येऊन आपला परिचय दिला.

धनगर समाजातील गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनीचा विशेष गुणवत्ता प्राप्त मुला मुलींना, समाज बांधवांना, जेष्ठ नागरिकांना पुष्पगुच्छ व भेट वस्तू देऊन सन्मानित करण्यात आले,या वेळी सदानंद लाळगे, संतोष पिसे, आणि मंडळ अध्यक्ष शिवाजी पिसे यांनी समाज बांधवांना अमूल्य, महत्वपूर्ण मार्गदर्शन केले.सांस्कृतिक कार्यक्रमात लहान मुले मुलीनी वेगवेगळ्या गाण्यावर नृत्य करुन उपस्थित असलेल्यांची मने जिंकली, काही महिला भगिनीं भावगीत, लावणी म्हटली, सांस्कृतिक कार्यक्रमांचे सूत्रसंचालन उज्वला लाळगे, लक्ष्मी लाळगे, नयना चांगण यांनी केले तर सत्कार प्रसंगी विशाल पिसे, संतोष पिसे,व सदानंद लाळगे यांनी सूत्रसंचालन केले.मल्हारी लाळगे, आप्पासाहेब कुचेकर, सदानंद लाळगे, संतोष पिसे, भारत कवितके, शिवाजी पिसे, सुनिल भगत, नारायण पिसे, अजित चांगण, महेंद्र काळे, मनोज पिसे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सागर पिसे, मधुकर कुचेकर, बाळासाहेब पिसे, राजेश कुचेकर, सतिश पिसे यांनी विशेष परिश्रम घेतले.