Engage Your Visitors!

आठव्या अखिल भारतीय मराठी नक्षत्र महाकाव्य संमेलनाच्या आयोजनाची घोषणा रायगडावर 

नक्षत्राचं देणं काव्यमंच ,मुख्यालय ,पुणे ३९ च्या वतीने कवींसाठी वेगळे उपक्रम राबवले जातात .यावेळी रायगड किल्ला नक्षत्र काव्य सहल आयोजित करण्यात आली होती. तसेच संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आठवे अखिल भारतीय मराठी नक्षत्र महाकाव्यसंमेलनाचे आयोजन दि.१७ व दि.१८ मे २०२५रोजी पिंपरी चिंचवड कवितेच्या राजधानी मध्ये आयोजन करण्याची रायगडावर घोषणा करण्यात आली. तसेच या महाकाव्यसंमेलन महाकाव्यसंमेलन अध्यक्ष म्हणून बोल्ड कवी म.भा.चव्हाण,पुणे यांची सुद्धा निवड यावेळी करण्यात आली . त्यांच्या निवडीचे पत्र त्यांना याप्रसंगी देण्यात आले.

तसेच “भारतरत्न रमाई” महाकाव्यग्रंथाचे सुद्धा प्रकाशन करण्यात आले. तसेच कवी नवनाथ पोपळे यांच्या “बापाची सावली” या काव्यसंग्रहाचे प्रकाशित करण्यात आले. साईराजे पब्लिकेशन ,पुणे यांच्यावतीने एका वर्षात ३६५ पुस्तके प्रकाशनचा संकल्प रायगडाच्या साक्षीने करण्यात आला.

याप्रसंगी कवी म. भा. चव्हाण म्हणाले की,”पंचवीस वर्ष काव्य क्षेत्रात सातत्यपूर्ण काम करणारी महाराष्ट्रातील एकमेव अशी नक्षत्राचं देणं काव्यमंच संस्था आहे. विविध कवितेचे प्रयोग करणारी एक क्रियाशील संस्था आहे. या संस्थेने माझी ८ व्या अखिल भारतीय मराठी नक्षत्र महाकाव्यसंमेलन अध्यक्षपदी निवड केल्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानत आहे. रायगडाच्या साक्षीने सर्वांच्या लेखणीला आणि जीवनाला एक ऊर्जा मिळाली आहे. महाराष्ट्राचं दैवत असलेले श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचा गौरव करणारा सोहळा व माय मराठीचा गौरव होणारा हा सोहळा आज रायगडावर संपन्न झाला. भविष्यामध्ये महाराष्ट्राची अस्मिता व माय मराठी सेवा आपल्या सर्वांच्या हातातून घडू हीच या निमित्ताने अपेक्षा व्यक्त करतो.”

ये, शेर शिवा, समशेर शिवा

शिवनेर शिवा,रणभेर शिवा

औफेर शिवा, चौफेर शिवा

साक्ष भीमेचे पाणी देईल,

महाराष्ट्र माझा

सह्याद्रीचा पुत्र शिवाजी

रयतेचा राजा

यावेळी नरवीर तानाजी मालुसरे यांच्या वंशज प्रा. डॉ. शितल मालुसरे यांनी या ठिकाणी या काव्य सहली सहभाग घेऊन आपल्या धारदारचनांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. शूरवीर तानाजी मालुसरे आणि छत्रपती शिवराय यांच्या अनेक प्रसंगाला त्यांनी उजाळा दिला. अशा उपक्रमाने संस्थेच्या माध्यमातून समाज प्रबोधनाची व जीवनातील विविध बदलांची भूमिका आपल्याला लक्षात येते.

पूर्वजांचा आशीर्वादाला,

जे कार्यकर्तृत्वाची जोड

शोभला पाहिजेस वंशज

हाच एक संकल्प रोड

रायगडावर नक्षत्र काव्य मैफल.. छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करून ,आपल्या विविध काव्यरचना बहारदार सादर केल्या.रायगडावर काव्य जागर करून नक्षत्राचं देणं कायमंचच्या वतीने अभिनव असा उपक्रम घेण्यात आला होता.यावेळी बोर्ड कवी म. भा.चव्हाण पुणे, कवी वादळकार भोसरी,नरवीर तानाजी मालुसरे यांच्या वंशज प्रा. शितल मालुसरे, हभप. डॉ. रवींद्र सोमवंशी आणि नवनाथ पोकळे दिलीप विधाटे , ज्ञानेश्वर वायकर, सौ प्रीती सोनवणे, सौ रुपाली भालेराव, साजिद मोमीन,बबन चव्हाण, अशोक सोनवणे, काळूराम शिंदे, नेहा भालेराव, संगीता सोनवणे, प्रसाद भागवत, रवी माळी, जुली यादव तसेच शिवप्रेमी इ.नी यात सहभागी घेतला.

राजमाता जिजाऊ यांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेऊन सर्व नक्षत्र रायगडाकडे रवाना झाली. महाराजांना मुजरा करीत काव्यसंग्रह प्रकाशन सोहळा तसेच काव्याचा जागर करण्यात आला.मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आहे.याचे अभिवादन करण्यासाठी रायगडावर नक्षत्र गेली होती.माय मराठीचा जागर करण्याचा प्रयत्न केला.रायगडाचे दर्शन म्हणजे मराठीची अस्मिता जागृत होय.

तसेच महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून, महाराजांच्या समाधीचे दर्शन घेण्यात आले. रायगडाच्या विविध वास्तूंचे मार्गदर्शन तेथील स्थानिक गाईडने केले. रायगडाची भव्यता आणि रायगडावरचे ऊर्जा मनात साठवत सर्व नक्षत्र परतीच्या प्रवासाला निघाली. सर्व कवींची “रायगड किल्ला बहारदार काव्य मैफल “आपल्या रचनातून संपन्न केली.अशी माहिती संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. राजेंद्र सोनवणे यांनी दिली.