Engage Your Visitors!

दुबई येथे होणाऱ्या विश्व मुक्त सृजन मराठी साहित्य संमेलनात होणार लोककवी सीताराम नरके यांच्या ” वंदन तयांना करू ” कविता संग्रहाचे प्रकाशन

पुणे – ५ ते १० डिसेंबर २०२४ या दरम्यान दुबई येथे पहिल्या विश्व मुक्त सृजन मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून या संमेलनात लोककवी – सीताराम नरके यांच्या ” वंदन तयांना करू “या कविता संग्रहाचे प्रकाशन संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ.विश्वनाथ शिंदे व प्रमुख पाहूणे गोव्याचे माजी उपमुख्यमंत्री मा रमाकांतजी खलप यांच्या शुभ हस्ते व उद्घाटक , प्रा . डॉ . मोना चिमोटे, स्वागताध्यक्ष डॉ .डी . एस काटे , प्रमुख पाहुण डॉ . स्मिता पाटील, मा .श्री शरद परब, प्राचार्य डॉ . उत्तमराव पांचाळ, डॉ . मुरहरी केळे, डॉ .अनिता तिळवे ,प्राचार्य डॉ . नागनाथ पाटील ,डॉ . पी विठ्ठल तसेच स्वागत समितीचे कार्यवाह डॉ . महेश खरात, डॉ .संतोष देशमुख, डॉ रामकिशन दहिफळे व हनुमंत सोनवणे यांच्या शुभ उपस्थितीत होणार आहे.

सीताराम नरके यांनी ३५ वर्ष पोलीस खात्यात सदैवं तत्पर राहून समाजाची सेवा केली आहे . साहित्याची जीवापाड जोपासना करणारे श्री नरके यांना आता पर्यन्त अनेक पुरस्कारांनी पुरस्कृत केले असून अनेक साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे . दोन मराठी चित्रपट आणि पाच मराठी नाटकात त्यांनी अभिनय केला असुन ” पुस्तक बंद ” या मराठी चित्रपटासाठी त्यांनी गीत लेखन केले आहे.

पोलीस सेवेतील त्यांच्या कामगिरीमुळे त्यांना राष्ट्रपती पोलीस पदकाने गौरविण्यात आले आहे. सीताराम नरके हे साहित्य क्षेत्रातील सुरपरिचित नाव असून आता पर्यन्त त्यांची १० पुस्तके प्रकाशित झाला असून ” वंदन तयांना करू ” हे त्यांचे अकारावे पुस्तक आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर कवी सीताराम नरके यांच्या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ परदेशात होत असल्याने मराठीचा डंका दुरवर वाजणार. त्यामुळे त्यांचे अनेक संस्थानी, साहित्यिकांनी आणि नातेवाईकांनी कौतुक करून शुभेच्छा दिल्या आहेत.

 

‘हिरवं सपन’ कथासंग्रहाला प्रथम पुरस्कार कवी सातपुते यांचा जळगावत उद्या सत्कार

जळगाव – लातूर येथील सुप्रसिद्ध कवी, वात्रटिकाकार, लेखक भारत सातपुते यांच्या मराठी भाषेतील ‘हिरवं सपन’ या कथासंग्रहाला जळगावच्या हिंदी साहित्य गंगा संस्थेचा देशपातळीवरील प्रथम पुरस्कार जाहीर झाला असून उद्या बहुभाषिक साहित्य संमेलनात जळगाव येथे प्रदान केला जाणार आहे अशी माहिती या संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा डॉ. प्रियंका सोनी ‘प्रीत’ यांनी कळवले आहे.डॉ.सुहास गाजरे, दलीचंद्र जैन, माजी मंत्री आ.गिरीश महाजन, जिल्हाधिकारी आदी मान्यवरांच्या उपस्थित हा सत्कार सोहळा आहे. विविध भाषेच्या २०२३ मधील साहित्यकृतींना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

रोखरक्कम ,स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र हे पुरस्काराचे स्वरूप असून जळगाव येथे शनिवार व रविवार असे दोन दिवशीय दहावे बहुभाषिक साहित्य संमेलन संपन्न होत आहे .या संमेलनात मराठी, हिंदी ,गुजरातीसह अनेक भाषेतील मान्यवर साहित्यिक उपस्थित राहणार आहेत .चर्चासत्र, परिसंवाद ,कवीसंमेलन, सांस्कृतिक कार्यक्रम असे संमेलनाचे स्वरूप असून बहुभाषिक कवी संमेलनाचे सूत्रसंचालनही लातूरचे कवी भारत सातपुते हे करणार आहेत.

साहित्याच्या विविध वांग्मय प्रकारात भारत सातपुते यांची पाच डझन पुस्तके प्रकाशित झाली असून कथासंग्रह प्रकारात त्यांची सात पुस्तके प्रकाशित झाली आहेत. हिरवं सपन हा त्यांचा गतवर्षी प्रकाशित झालेला कथासंग्रह आहे. भारत सातपुते यांना आज पर्यंत 67 पुरस्कार लाभले आहेत .

राष्ट्रीय कवी संजय मुकूंदराव निकम यांनी जेष्ठ साहित्यिक यशवंतराव पाटील यांची दीवाळी निमित्ताने घेतली भेट

नाशिक. प्रतिनिधी, मालेगाव चे सुप्रसिद्ध राष्ट्र कवी संजय निकम यांनी प्राध्यापक डॉक्टर यशवंतराव पाटील सर यांच्या घरी भेट दिली असता त्यांनी त्यांचा जगण्याची कविता हा कवितासंग्रह भेट दिला.  त्यांचा जगण्याची कविता हा संग्रह समीक्षणासाठी राष्ट्र कवी लेखक,समीक्षक व भाषा अनुवादक संजय निकम यांना दिला .दोन दिग्गज साहित्यिकांनी आजच्या साहित्य व समाज संस्कृती या विषयावर निवांत चर्चा केली.आणि एकमेकांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.

काजव्याची रात मराठी कविता 

काजव्याची रात 

 

एक रात्र ही अशी असावी….

दोन जीवांची ती रात्र काजव्यांबरोबर असावी….

 

वेडावल्या क्षणानी, समयास धुंदी यावी…

बहरून चांदण्यानी, अंगणी धुंद रात्र यावी….

 

एक रात्र काजव्यांची अशी सजावी 

 मिठीतल्या तनूला ती कोमल काया भासावी…..

 

आपल्या दोघांच्या प्रेमाचे गुपित त्या काजव्यांना कळावे

आपल्या प्रेमाचे प्रतीक म्हणून काजव्यांनी हळूच पाहावे…..

 

तुझ्या माझ्या नात्याला अंत नाही

तशी अंधारात चमकण्याऱ्या काजवांना सीमा नाही….

 

येता आठवण तुझी, ती तशीच मनी जपावे

काजव्यांची चमक आता अंधार प्रकाशी नहावे….

 

 कोमल सागर नाईक

 नऱ्हे,आंबेगाव पुणे.

डाॅ.मधुसूदन घाणेकर यांचा आंतरराष्ट्रीय शताब्दी सन्मान

काव्य ,गायन, व्यंगचित्र, संपादन, अभिनय , ज्योतिष, हस्ताक्षर मनोविश्लेषण, शीळवादन आदि विविध क्षेत्रात डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर मिळवलेल्या दैदीप्यमान कारकिर्दीबद्दल सनफ्लाॅवर USA संस्थेतर्फे नुकतेच आंतरराष्ट्रीय शताब्दी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.सदर पुरस्कार सनफ्लाॅवर,USA च्या आंतरराष्ट्रीय समन्वयक सौ.वसुधा नाईक यांच्या शुभहस्ते डाॅ.मधुसूदन घाणेकर यांना प्रदान करण्यात आला.

प्रास्ताविक आणि संयोजन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते वैभव नाईक यांनी केले.डाॅ.मधुसूदन घाणेकर सातत्याने देशविदेशात गेल्या 60 वर्षांहून अधिक काळ आपल्यामधील कलागुणांना विश्वाभिमुख करीत आहेत आणि त्यांच्या याच योगदानासाठी डाॅ.घाणेकर यांना सन्मानित केले असल्याचे सौ.वसुधा नाईक यांनी सांगितले.याप्रसंगी श्रीमती विद्या नाईक, हेमंत फुले, वैशाली फुले आदि मान्यवर उपस्थित होते. डाॅ.मधुसूदन घाणेकर यांना नुकताच इंटरनॅशनल सुपरस्टार ॲवाॅर्डही प्राप्त झाल्याबद्दल सौ.वसुधा नाईक यांचे याप्रसंगी अभिनंदन केले. डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी पुरस्काराला उत्तर देताना भारतीय अध्यात्माविषयी कृतज्ञता व्यक्त केली.