Engage Your Visitors!

सर्व भाषांच्या पलिकलडल्या मनांतरातील भावनाश

सर्वत्र इथून तिथुन सारी निसर्गसृष्टि , सारी पंचमहाभूते त्यांचा आविष्कार , सारे जग , सारी माणसं , साऱ्या सुख संवेदना , सारी स्थित्यंतरे , सारं सारं सारखं असलं तरीही मानवी मनातील वैचारीकता मात्र भिन्न भिन्न दिसून येते ..! 

मानवी मनामद्धये असणारे अपेक्षित आत्मिक समाधान देणारे प्रेमास्थेच्या भावनांचे रूप मात्र एकच असते.! तिथे फक्त *एक आत्मिक सुखानंद परस्पर प्रेमभाव अपेक्षित असतो.

काल अचानक एक परदेशी अबुधाबी येथील मन्सूर खान नावाचे अनोळखी व्यक्तिमत्व बोटनिकल गार्डन बंगलोर येथे सहजच मला भेटले. त्यांच्या स्मितहास्या मुळे मी अगदी सहज आकर्षून गेलो. पटकन हाय , हॅलो म्हणावे तर भाषेची अनभिज्ञता होती. कुठल्या भाषेत बोलायचे हाच मोठा प्रश्न होता. त्यांना फक्त त्यांचीच भाषा येत होती . आमचे एकमेकांचे संभाषण तसे कुणालाच कळणारच नव्हते. पण आम्हा उभयतांच्या चेहऱ्यावरील भाव आणी डोळ्यातील अव्यक्त असलेले मनभावनांचे रूप , अंतरातील ओढ , मु्कशब्द सारं काही सांगत होते. चेहरे बोलत होते. एकमेकांच्या निर्मळ हस्तांदलनातून झालेला स्पर्श देखील अनेक जन्मांची ओळख परस्परांना सांगून गेला होता.! 

दैवयोग कसा असतो पहा…! योगायोगाने अगदी सहज एक ट्रांसलेटर भेटला तो त्यांच्या टुरिस्ट गाडीचाच भारतातलाच ड्रायव्हर होता. त्याने आम्हा उभयतांच्यात दुभाषी म्हणून सहकार्य केले . त्यामुळे आमचे संभाषण होऊ शकले ..परिचय देखील झाला ……

एक अनभिज्ञ व्यक्ती पण किती आस्था ! किती प्रेम आणि भावुकता किती मृदुलता ! किती नम्रता ! लाघवी व्यक्तिमत्व ! त्यांच्या नजरेतुन जाणवत होते. हे शब्दात व्यक्त करता येत नाही. त्यांचे वय 60 माझे वय 75 तरीही दिलखुलास बोलणे झाले . त्यांचा कौटुंबिक परिचयही झाला. 

विशेष म्हणजे एका तासा दोन तासाच्या प्रवासात झालेल्या या पहिल्या भेटितच त्यांनी आम्हा कुटुंबाला ते बेंगलोरला ज्या हॉटेल ताज एक्झयुकेटिव्ह येथे उतरले होते त्या ठिकाणी (दावत) जेवणाचेही निमंत्रण दिले ..!

हे त्यांच्या मनाचे मोठ्ठेपण होते…!

हे एक आश्चर्य होते….!

माझ्याबरोबर माझा 6 वर्षाचा नातू होता. त्याला त्यांनी प्रेमाने कडेवर उचलुन घेतले आणि कवटाळले. त्याक्षणी त्यांच्या चेऱ्यावरचे ते निष्पाप प्रसन्नतेचे भाव मलाही अंतर्मुख करून गेले.माझ्या नातवाला नको ,नको म्हणत असताही देखील रु .१०००/- हातात दिले देखील.

मन्सूर खान ही परदेशी अबुधाबीची व्यक्ती की ज्यांचा जीवनात कधीच कुठलाही सुतराम संबंध नाही अशी अनभिज्ञ व्यक्ती अचानक भेटते काय आणि आणि क्षणार्धात अनेक जन्मांचे नाते असल्यासारखी वागते काय ? याचे माला खुपच आश्चर्य वाटले.

आम्ही त्यांच्या हॉटेलवर त्या कुटुंबाला भेटलो आणि नंतर मी देखील त्यांना बेंगलोर मधील माझे घरी येण्याचे निमंत्रण दिले ..! ते आले देखील शेवटी मी हे आपले पूर्वजन्मिचेच ऋणानुबंध आहेत असे वर दाखवून म्हणालो ! त्यांच्या सोबत असलेल्या दुभाषी ड्रायव्हर व्यक्तीने त्यांना ते त्यांना त्यांच्या भाषेत समजावून सांगीतले तेंव्हा मन्सूरअलीने,, देखील वर आकाशाकड़े पाहिले ! 

आणि वर हात दाखविला आणी मलाही घट्ट मिठी मारली आणी गहिवरल्या नेत्रानी दूरदूर वर हात उंचावत आमचा निरोप घेतला होता ..! हे काय कळले नाही ! पण मन मात्र विचारात मग्न झाले . असा अनुभव आपल्याला अगदी जवळच्या प्रेमाच्या माणसांबाबतीत देखील क्वचितच अनुभवास येतो ,हे वास्तव नाकारता येत नाही …!

इथून तिथून सर्व जगतात मानव आणि मानवता यांची संवेदनशीलता यांची या भेटीत जाणीव झाली. मानवी निष्पाप प्रेमभावस्पर्श हे एकच असतात. प्रेम , आपुलकी , आस्था , ओढ़ , काळजी , दानत , त्याग , कृतज्ञता , समाधान ही संस्कारित कनवाळू मानवी मनाची संवेदनांची प्रतीके सर्व त्रिभुवनात एकसारखी आहेत….!!!

ती विनामूल्य सहज देण्यासारखी आहेत. अबुधाबीचे हे मानवी मनाचे मन्सूरअली व्यक्तिमत्व भाषेच्या पलीकडे असूनही निरागस प्रेम भाव स्पर्शातून आत्मीयतेचे दर्शन देवून जन्मोजन्मीचे ऋणानुबंध सांगून गेले हे मात्र खरे …!!!!!!!!

इती लेखन सीमा

 

वि.ग.सातपुते ..

संस्थापक अध्यक्ष:

महाकवी कालिदास प्रतिष्ठान

पुणे , मुंबई , ठाणे , मराठवाडा, (महाराष्ट्र )

📞( 9766544908 )

 

 

कांदिवली मध्ये धनगर समाज विकास मंडळा तर्फे महाराजा यशवंतराव होळकर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादनचा कार्यक्रम संपन्न

भारत कवितके मुंबई, कांदिवली पश्चिम

मुंबई मधील कांदिवली पश्चिम या उपनगरा मध्ये धनगर समाज विकास मंडळाच्या वतीने ३ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ७ वाजता कांदिवली चारकोप येथील मंडळाचे कार्याध्यक्ष सुनील भगत यांचे घरी प्लाट नंबर २४२,रुम नंबर डी ४६, सेक्टर २, गणेश मंदिर गल्ली या ठिकाणी कांदिवली मधील धनगर समाज बांधवांच्या उपस्थिती मध्ये अपराजित यौध्दा महाराजा यशवंतराव होळकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादनचा कार्यक्रम संपन्न झाला.सुरुवातीला महाराजा यशवंतराव होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून, दिप प्रज्वलीत करून,भंडारा लावून, विनम्र अभिवादन करण्यात आले.

या प्रसंगी धनगर समाज विकास मंडळाचे प्रवक्ते , संस्थापक सदस्य, पत्रकार, साहित्यिक, गीतकार सामाजिक कार्यकर्ता भारत कवितके यांनी अपराजित यौध्दा भारताच्या स्वातंत्र्याचे प्रणेते महाराजा यशवंतराव होळकर यांच्या जीवनाबद्दल, कार्याबद्दल, माहिती सांगितली.आणि उपस्थित समाज बांधवांचे आभार मानले.अशा प्रकारचे उत्सव, जयंती, पुण्यतिथी समाजात होऊन गेलेल्या महान व्यक्ती च्या नावाने करायला हवे.असे सांगितले.

या जयंती प्रसंगी भारत कवितके, जेष्ठ समाज बांधव दशरथ लाळगे, संस्थापक सदस्य आप्पासाहेब कुचेकर, मंडळाचे अध्यक्ष शिवाजी पिसे, मंडळाचे कार्याध्यक्ष सुनील भगत, मंडळाचे उपाध्यक्ष महेंद्र काळे, संस्थापक सदस्य सदानंद लाळगे सर, समाज बांधव किसन बरगडे, समाज बांधव राजेंद्र लाळगे,सौ.आशा भगत, कुमारी श्रावणी भगत व इतर समाज बांधव व भगिनी उपस्थित होते.

पाणीदार माणूस मधुकर धस यांच्या आठव्या स्मृती दिनानिमित्ताने त्यांच्या समाधीस पुष्पहार अर्पण

पाणीदार माणूस मधुकर धस यांच्या आठव्या स्मृती दिनानिमित्ताने तुरोरी तालुका उमरगा या ठिकाणी समाधीस पुष्पहार अर्पण करून समाज विकास संस्थेचे सचिव महाराष्ट्र लोकविकास मंचाचे कार्यकर्ते भूमिपुत्र वाघ,अनाथाची माय विद्याताई वाघ, आप्पा जाधव,भाग्यश्री मोरे, आफ्रिन मुल्ला, कृष्ण पाटील, प्रशांत ढवळे, यांनी अभिवादन केले.

भोगजी तालुका उमरगा जिल्हा धाराशिव या ठिकाणी जन्म झालेले मधुकर धस हे 1990 झाले यवतमाळ जिल्ह्यामध्ये गेले. त्या ठिकाणी दिलासा संस्था स्थापन करून महाराष्ट्रातल्या 14 ते 20 जिल्ह्यांमध्ये पाण्यासाठी काम केलं. महाराष्ट्रातील विशेष थोर समाजसेवक, बाबा आमटे मकरंद अनासपुरे नाना पाटेकर विश्वात्मा तोडकर आमिर खान, देवेंद्र फडणवीस यांना वेड लावणारे कार्य मधुकरणी पाण्यासाठी उभे केले, या जलनायकास समाज विकास संस्था महाराष्ट्र लोकविकास मंचच्या वतीने महाराष्ट्रातील विविध ठिकाणी अभिवादन करण्यात आले.

कवी इंद्रजीत पाटील पुरस्काराने सन्मानित

 हुतात्मा राष्ट्रबंधू राजीवभाई दीक्षित यांची जयंती व पुण्यस्मरणाचे आैचित्य साधून कवी इंद्रजीत पाटील यांना स्वदेशी भारत सन्मान राज्यस्तरीय पुरस्कार – २०२४ ने सन्मानपूर्वक सन्मानित करण्यात आले. त्यांच्या ‘ कळ पाेटी आली आेठी ‘ या परिपूर्ण अष्टाक्षरी कवितासंग्रहास हा पुरस्कार देण्यात आला.प्रस्तुत कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्रीमंत शिवरूपराजे उर्फ बाळराजे खर्डेकर ,अध्यक्ष श्री.अरविंदभाई मेहता,श्री.पंडीतराव लाेहाेकरे,श्री.रवींद्र बेडकीहाळ,श्री.धैर्यशील भाऊ देशमुख,सुप्रसिद्ध कवी हनुमंत चांदगुडे,विद्या दाैलत सरपाते,श्रीमंत.धीरेंद्रराजे खर्डेकर,श्री.जीवन इंगळे गुरूजी,श्री.रघुवीर नारायण माने-पाटील,श्री.प्रमाेद सदाशिव झांबरे व इतर प्रमुख मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना सुपूर्द करण्यात आला.

या कवितासंग्रहास मिळालेला हा पहिलाच राज्यस्तरीय पुरस्कार असून श्री.काळेश्वर ग्रामविकास प्रतिष्ठान व स्वदेशी भारत बचत गट संकुडे मळा,आसू,ता.फलटण, जि.सातारा याठिकाणी त्यांना सन्मानित करण्यात आले.श्री.काळेश्वर मंदिर,आसू याठिकाणी बहारदार काव्यसंमेलनाचा कार्यक्रमही पार पडला.श्री.प्रकाश सकुंडे गुरूजी,वसंत सकुंडे व इतर संयाेजक कमिटीने सदर कार्यक्रमाचे फार सुंदर नियाेजन केले.कवी इंद्रजीत पाटील यांच्या साहित्यिक कामगिरीचे सर्वत्र काैतुक हाेत आहे. मित्र,नातेवाईक यांच्याकडून त्यांच्यावर अभिनंदन व हार्दिक शुभेच्छांचा वर्षाव हाेत आहे.

डाॅ.मधुसूदन घाणेकर म्हणजे सर्वांना शाश्वत आनंद देणारे व्यक्तिमत्व : सुनिता कावसनकर          

आंतरराष्ट्रीय कलावंत, विचारवंत आणि साहित्यिक डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी भारतासह 20 देशांमधे , भेटेल त्या,रसिकाचे ग्रॅफाॅलाॅजि, ज्योतिष, शीळवादन, गायन,हास्यविनोद आदि विविध प्रकारे निरपेक्ष..विनामूल्य मनोरंजन करुन दिलासा दिला आहे. आत्तापर्यंत त्यांनी लाखो रसिकांची मने जिंकली आहेत. मनोरंजन करताना त्यांनी सर्वत्र मानवधर्म:श्रेष्ठ धर्माचा प्रसार स्वखर्चाने केला आहे. दैनंदिन जीवनात ते सर्वांशी हसतमुखाने सकारात्मक पध्दतीने सुसंवाद साधून सतत आनंद देत असतात.

डाॅ.मधुसूदन घाणेकर म्हणजे दुस-याला शाश्वत आनंद देणारे या युगातील एकमेव व्यक्तिमत्वच म्हणावै लागेल. असे गौरवोद्गार युगंधरा आंतरराष्ट्रीय मराठी साहित्य कला व सांस्कृतिक प्रतिष्ठान संस्थेच्या संस्थापक, अध्यक्ष सौ.सुनिता कावसनकर यांनी डाॅ.मधुसूदन घाणेकर यांना 2024 चा युगंधरा आंतरराष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार ऑनलाईन प्रदान करताना काढले. अध्यक्षस्थानी भारतीय जनता पार्टी-ज्येष्ठ महिला आघाडीच्या कार्याध्यक्ष भारती महाडिक होत्या.

प्रमुख अतिथी वसुधा इंटरनॅशनल संस्थेच्या अध्यक्ष सौ.वसुधा नाईक यांनी डाॅ.मधुसूदन घाणेकर यांच्या विविध क्षेत्रातील गेल्या सहा दशकातील झंजावती वाटचालीवर प्रकाशझोत टाकला. वर्ल्ड क्वीन बीजच्याअध्यक्ष मधुकर्णिका यांनी सूत्रसंचालन केले.प्रास्ताविक आणि आभार तितिक्षा इंटरनॅशनल संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष प्रिया दामले यांनी केले.

तितिक्षा इंटरनॅशनल सारख्या संस्थांमुळे राष्ट्रविकास घडतो-डाॅ.मधुसूदन घाणेकर

गेली 10 वर्ष तितिक्षा इंटरनॅशनल ही संस्था सातत्याने राष्ट्रविकासाच्या कार्याला हातभार लावत आहे. महिलांचे सबलीकरण , बाल कल्याण, वंचित विकास, साहित्य – संस्कृती – कला-अशा विविध पातळीवर ही संस्था अविरतपणे काम करीत आहे.तितिक्षा इंटरनॅशनल सारख्या संस्थांमुळेच राष्ट्रविकास घडत आहे ” असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय कीर्तिचे विचारवंत, कलावंत आणि साहित्यिक डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी केले.

तितिक्षा इंटरनॅशनल संस्थेच्या दशकपूर्ती सोहळ्याच्या उदघाटन प्रसंगी डाॅ.मधुसूदन घाणेकर बोलत होते. याप्रसंगी तितिक्षा इंटरनॅशनल संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष प्रिया प्रमोद दामले, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मंदाताई नाईक, कर्नल विनायक अभ्यंकर, रंगकर्मी सतीश इंदापूरकर, ज्येष्ठ साहित्यिक म.भा.चव्हाण वि.ग.सातपुते, भारतीय विचारधारा संस्थेच्या संस्थापक-अध्यक्ष भारती महाडिक, वर्ल्ड क्वीन बीज संस्थेच्या अध्यक्ष मधुकर्णिका सारिका सासवडे, वसुधा इंटरनॅशनल संस्थेच्या अध्यक्ष वसुधा नाईक, महिला सन्मान संस्थेच्या सचिव दीपाराणी गोसावी आदि मान्यवर उपस्थित होते.

तितिक्षा इंटरनॅशनल संस्थेच्या दशकपूर्ती सोहळ्याचे औचित्य साधून डाॅ.मधुसूदन घाणेकर संपादित विश्वविक्रमी डहाळी अनियतकालिकाच्या 599 व्या अंकाचे प्रकाशन करण्यात आले. या सोहळ्यातील काव्यसंमेलनात अरविंद देशपांडे, प्रा.शरदचंद्र काकडे, संगीता राजपूत, सुरेश सेठ, संगीता राजपूत, प्रतिभा पोतदार , डाॅ.अलका कुलकर्णी मनोहर वाळिंबे,विवेक जोशी, प्रकाश पाठक, हेमलता गीते, श्वेतांबरी भटकर, सुलभा गोगरकर आदिंच्या कवितांनी उत्स्फूर्त दाद मिळवली. विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमात अजित कुंटे (कथाकथन) , स्वाती दिवाण ( नाट्यछटा ) ,
शंकर जाधव (दादा कोंडके यांचे किस्से )आदिंनी आपल्या
अदाकरीतून रसिकांची मने जिंकली.

सुवर्णा जाधव यांनी सूत्रसंचालन केले. संस्था सचिव अजिता मुळीक, बालसचिव अजया मुळीक, पुरुषोत्तम कुंटे, दीपाराणी गोसावी, विजय सातपुते आदिंनी या सोहळ्याचे संयोजन केले. विविध पातळीवरील साहित्य विषयक स्पर्धेतील विजेत्यांना प्रिया दामले यांच्या शुभहस्ते जाहिर सन्मान करण्यात आले. डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी उत्तरार्धात ‘सबकुछ.मधुसूदन ‘ह्या एकपात्री प्रयोग सादर केला.

साहित्यिक भारत कवितके यांची आदर्श साहित्य रत्न पुरस्कार २०२५ करीता निवड

माणुसकी मल्टीपर्पज फाऊंडेशन मलकापूर जिल्हा बुलढाणा यांच्या वतीने मुंबई कांदिवली पश्चिम येथील जेष्ठ पत्रकार साहित्यिक गीतकार सामाजिक कार्यकर्ता भारत कवितके यांची राष्ट्रभक्ती सेवा गौरव पुरस्कार २०२५ मधून आदर्श साहित्य रत्न पुरस्कार २०२५ करीता निवड झाल्याचे निवड पत्र फाऊंडेशन चे अध्यक्ष विवेक राजापुरे यांनी भारत कवितके यांना दिले आहे.

साहित्यिक भारत कवितके यांच्या कथा, कविता, चारोळ्या, लेख व इतर लिखाण सोशल मीडिया वर आणि वृत्त पत्रातून सातत्याने वाचायला मिळते, साहित्य क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल भारत कवितके यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.त्यांच्या सल या कथेने नुकताच राज्यस्तरीय प्रथम क्रमांक पटकावला आहे.

त्यांच्या कथा कविता चारोळ्या वास्तव वादी जीवनाचा अचूक पणे वेध घेतात.सांज (काव्य संग्रह), माझ्या गावाच्या दिशेने ( काव्य संग्रह) शोधतो मी किनारा ( चारोळी संग्रह),अरे मी एकटा.(चारोळी संग्रह) आणि आयुष्य उसवताना हे आत्मचरित्र अशी पुस्तके साहित्यिक भारत कवितके यांची आतापर्यंत प्रकाशित झाली आहेत, विशेष म्हणजे या सर्व पुस्तकांना विविध ठिकाणी राज्य स्तरीय पुरस्कार मिळाले आहेत.गोवा,मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली, गुजरात व, महाराष्ट्र राज्यातील विविध ठिकाणांहून भारत कवितके यांना पत्रकारिता, साहित्य , सामाजिक क्षेत्रात, गीतकार या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बद्दल आतापर्यंत एकूण ११५४ पुरस्कार मिळाले आहेत.त्यांची सहा गाणी युट्यूबवर प्रचंड गाजत आहेत.साहित्यिक भारत कवितके यांनी आदर्श साहित्य रत्न पुरस्कारासाठी निवड होताच प्रतिक्रिया दिली की,” सन २०२५ या वर्षातील माझा हा पहिलाच पुरस्कार मला पुढील काळात लिखाणासाठी प्रेरणा देत राहील.

या पुरस्काराने मला फार आनंद झाला आहे.पुरस्कार प्रेरणा देतात, प्रोत्साहन देतात.तसेच कामाची जबाबदारी ही वाढवितात,यांची मला पूर्ण जाणीव असल्याने यापुढील लिखाण दर्जेदार सकस समाज उपयोगी होईल असे करीन . हा पुरस्कार जाहीर होताच मला माझ्या नातेवाईकांनी, मित्रांनी प्रत्यक्ष भेटून व मोबाईल वरून अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.त्यांचा मी मनापासून आभारी आहे.”

चंद्रकुमार नलगेंना वारणा मसापचा जीवनगौरव

कवि सरकार इंगळी

ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नलगे यांना महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा-वारणानगर च्या वतीने पहिला जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला.दि.7 व 8 डिसेंबर रोजी शाखेच्या वतीने विभागीय साहित्य संमेलनाचे विनय कोरे क्रीडा व सांस्कृतिक विकास केंद्र,वारणा विद्यापीठ,वारणानगर येथे आयोजन करण्यात आलेले आहे.

ग्रंथदिंडी,परिसंवाद,निमंत्रितांचे कवी संमेलन,कथा-कथन,ग्रंथ पुरस्कार वितरण आदी कार्यक्रम होणार आहेत.ग्रंथ व विविध वस्तू विक्री स्टाॅल उपलब्ध केले आहेत. संमेलनाध्यक्षपदी साहित्य अकादमीचे अध्यक्ष,पानिपतकार,विश्वास पाटील व स्वागताध्यक्ष,आ.डाॅ.विनय कोरे भूषवणार आहेत.मसापचे अध्यक्ष रावसाहेब कसबे,खा.धैर्यशिल माने, दलितमित्र, आ.अशोक माने,मसाप कार्याध्यक्ष मिलिंद जोशी,मसाप प्रमुख कार्यवाह-सुनिता पवार,विभागीय कार्याध्यक्ष-राजन मुठाणे यांची उपस्थिती आहे.


या निमित्ताने सन 2022-23 या वर्षात प्रकाशित साहित्यकृती मागवण्यात आलेल्या होत्या.यामधून निवड समितीने खालील साहित्य कृतींची निवड केलेली आहे.


1)स्व.तात्यासाहेब कोरे कादंबरी पुरस्कार
‘काळमेकर लाईव्ह’बाळासाहेब लबडे,गुहागर
2)स्वर्गीय सावित्रीअक्का कोरे काव्य पुरस्कार
‘अंतस्थ हुंकार’ शिवाजी शिंदे,सोलापूर
3)स्व.शोभाताई कोरे कथा साहित्य पुरस्कार
‘वसप’महादेव माने,सांगली
4)स्व.विलासराव कोरे संकीर्ण साहित्य पुरस्कार
‘परिघाच्या रेषेवर’ राजू पोतदार,कोल्हापूर
5)स्व.मामासाहेब गुळवणी बालसाहित्य पुरस्कार
‘अंगत पंगत’ शिवाजी चाळक,पुणे

वरील पुरस्काराचे वितरण संमेलनाच्या समारोप सत्रात सन्मानपूर्वक केले जाणार आहे.अशी माहिती मसाप-अध्यक्ष आ.डॉ.विनय कोरे व कार्याध्यक्ष- ग्रंथमित्र-डॉ.के.जी.जाधव यांनी दिली. वारणा परिसरातील साहित्य प्रेमिंनी याचा लाभ घ्यावा असेही आवाहन केले आहे. यावेळी मसाप वारणा पदाधिकारी,डाॅ.श्रीकांत पाटील,चंद्रकांत निकाडे,पी.एस.पाटील,पी.आंबी, पी.बी.बंडगरसर,शिवाजी बोरचाटे,प्रा.डाॅ.गिरी,प्रा.सुरेश आडके,अभिजीत कुंभार उपस्थित होते.

स्कूल ऑफ स्कॉलर्स बिर्ला कॉलनीचा क्रिडा महोत्सव उत्साहात संपन्न

अकोला- बिर्ला काॅलनी स्थित स्कुल ऑफ स्कॉलर्स या शाळेचा क्रीडा महोत्सव दिनांक 30 नोव्हेंबर 2024 रोजी शास्त्री स्टेडियम येथील मैदानावर शाळेच्या मुख्याध्यापीका डॉ. श्वेता दिक्षित यांच्या मार्गदर्शनात व क्रीडा विभाग प्रमुख स्वप्नील अंभोरे व क्रिडा शिक्षिका वैष्णवी निकोरे तसेच विज्ञान शिक्षक शशिकांत झंझाळ यांच्या नेतृत्वाखाली क्रीडा दिन साजरा करण्यात आला. 

  मशाल प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी डॉ.सतीशचंद्र दुर्गादत्त भट्ट व मेघे ग्रुप ऑफ स्कुलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आभा मेघे हे होते. स्कूल ऑफ स्कॉलर्सच्या कौलखेडच्या मुख्याध्यापिका , मनीषा उंबरकर , प्रशासकीय अधिकारी सुमित बोकाडे उपस्थित होते. पाहुण्यांचे पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले.मुख्याध्यापकांनी शाळेचा वार्षिक अहवाल सादर करून कार्यक्रमाची सुरुवात केली.

कार्यक्रमात नर्सरी ते दहावी पर्यंतच्या मुला-मुलींसाठी विविध क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या व विजेत्यांना पदके देण्यात आली. पालकांसाठी विविध स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले असून विजेत्या पालकांना पदक देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमात विविध क्रीडा साहित्याचा वापर करून नृत्य सादर करण्यात आले. या कार्यक्रमाचे सर्व पालकांनी कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुचिता खांडेकर, वैशाली अवचार व ज्योती तिवारी तिवारी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाची सांगता वंदे मातरमने करण्यात आली.

३ डिसेंबर रोजी महाराजा यशवंतराव होळकर (प्रथम) यांच्या २४८ व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन

भारत कवितके मुंबई, कांदिवली पश्चिम.

३ डिसेंबर २०२४ रोजी महाराजा यशवंतराव होळकर ( प्रथम) यांच्या २४८ व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन करण्यात येणार असल्याचे मुंबई कांदिवली पश्चिम येथील धनगर समाजाचे पत्रकार साहित्यिक गीतकार सामाजिक कार्यकर्ता भारत कवितके यांनी कळविले आहे.महाराष्ट्र राज्यातील विविध ठिकाणी महाराजा यशवंतराव होळकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत, पुणे जवळील वाफगाव किल्ले या ठिकाणी ३डिसेंबर १७७६ साली महाराजा यशवंतराव होळकर यांचा जन्म झाला, त्यांच्या वडिलांचे नाव तुकोजी होळकर होते,आईचे नाव यमुनाबाई होते, यमुनाबाई या तुकोजी होळकर यांच्या दासी होत्या.काशिराव, मल्हारराव, आणि विठोजीराव हे महाराजा यशवंतराव होळकर यांचे थोरले बंधू.

६जानेवारी १८०५ साली राज्याभिषेक सोहळा करून त्यांनी होळकर मराठा साम्राज्याची स्थापना केली आणि ते पहिले महाराजा झाले.महाराजा यशवंतराव होळकर हे एक कर्तबगार वीर पुरुष होते.भारतीय स्वातंत्र्याचे प्रणेते,संकटाची वादळे, युध्दाचा सतत झंझावात,सतत विजयाची आस, स्वातंत्र्याची आस, विश्वासघात सहज पचवून पुढे जाण्याची तयारी, अफाट नेतृत्व क्षमता, पराकोटीचे युद्ध कौशल्य, नितांत दुर्दम्य आशावाद प्रयत्नाची निराशा न केलेली पराकाष्ठा, क्षमाशीलता, शस्त्रूची क्रूरता, असे सर्व गुण एकत्र असणारा मराठा यौध्दा व राज्यकर्ता यशवंतराव होळकर होता, इंग्रजांचा त्यांनी अठरा वेळा पराभव करून सळो की पळो करून सोडले होते.अशा शूर वीरचा मृत्यू २८ आक्टोंबर १८११ मध्ये मध्य प्रदेश मधील भानपुरा येथे झाला.