डोंबिवली ग्रंथसंग्रहालयाचा “ध्यास ” दीपावली अंकाचा प्रकाशन सोहळा संपन्न*

Spread the love

 डोंबिवली ग्रंथसंग्रहालयाचा “ध्यास ” दीपावली अंकाचा प्रकाशन सोहळा 24.11.2024 रोजी सायंकाळी 4.30 वाजता संपन्न झाला. कार्यक्रमाचा शुभारंभ दीप प्रज्वलन व ईश्वर स्मरणाने झाला. संपादिका/सूत्र संचालिका शितल दिवेकर यांनी प्रमुख पाहुणे श्री नागेश हुलवळे व सर्व उपस्थितांचे स्वागत केले.त्यांनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणून सर्वांचे अभिनंदन केले. प्रमुख पाहुण्यांना व संस्थेच्या पदाधिकार्यानां व्यासपीठावर स्थानापन्न होण्याची विनंती केली.

सचिवांनी पुष्पगुच्छ व स्मृती चिन्ह देऊन पाहुण्यांचे स्वागत केले.अध्यक्ष सतिश कुलकर्णी यांनी अंकासंबंधित मेहनतीबद्दल सांगितले व संपादिकेचे कौतुक केले. दिवेकर मॅडमनी प्रमुख पाहुण्यांची ओळख व त्यांच्या कार्यक्षेत्राबद्दल माहिती दिली. मुखपृष्ठाच्या संकल्पनेला श्री जोशी,श्री कोर्डे व त्या स्वतः यांनी खूप शोध घेऊन मुर्तरूपात घडवले.तो प्रवास व त्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला.

अंकातले सर्व लेखकवर्गाचे अभिनंदन केले व आभार मानले. मग प्रमुख पाहुण्यांना त्यांचे विचार व्यक्त करायची विनंती केली. श्री नागेशजींनी अंकाची वैशिष्ट्ये इतकी सविस्तर सांगितली की अंक वाचनाचा उत्साह द्विगुणित झाला. त्यांनी एका दिवसाच्या अल्प अवधीत केलेली अंकाची सुंदर मिमांसा कौतुकास्पद आहे. प्रत्येक लेखाबद्दलचे विचार त्यांनी मांडले.ते पुढे बोलले की मुखपृष्ठ खूप रेखीव व ठळक आहे. त्यात समाविष्ट शिलालेख, माऊली, चक्रधर स्वामी, गर्जतो मराठी, संस्थेचा लोगो व भरारी घेत असलेले तीन पक्षी ह्या सर्वांची जर व्याख्या केली तर एक पूर्ण ग्रंथाची रचना होऊ शकते.भरारी घेणारे पक्षी दर्शवतात वैचारिक स्वतंत्रता आणि त्याचे उत्तम उदाहरण आहे हा ध्यास अंक.

मग त्यांनी अंकात प्रकाशित आपली कविता प्रस्तुत केली.सर्व लेखकांचे कौतुक, अति उत्तम संपादन व संस्थेचे आभार व्यक्त करुन त्यांनी आपले वक्तव्य संपवले. सचिव गीता रीठाल यांनी संस्थेची स्थापना,आता पर्यंतची वाटचाल, उद्दिष्टे व पुढच्या उपक्रम याबद्दल माहिती दिली. सर्व देणगीदारांचे आभार मानले.तसेच उपस्थित लोकांना संस्थेच्या पुढच्या प्रगतीसाठी देणगी देण्यासाठी आवाहन केले. त्यांनी सर्व लेखक वर्ग, संपादिका व प्रमुख पाहुण्यांना धन्यवाद दिले.

सर्व उपस्थित लेखकांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. सर्व लोकांना धन्यवाद देऊन संचालिकांनी कार्यक्रमाची सांगता केली. सूत्रसंचालन अति सुंदर झाले. त्याने कार्यक्रमाला एक आगळा वेगळा रंग दिला.

Exit mobile version