रेग्युलस ताऱ्याची भेट – भाग १

Spread the love

होय! रेग्युलस ताऱ्याला डॉ. मधुसूदन घाणेकर यांचे नाव दिले आहे.

आकुर्डी येथील एका कार्यक्रमामध्ये डॉक्टर घाणेकर यांची ओळख झाली. त्यांच्या अवतीभोवती सर्व होते मलाही तिथे पोहोचायचे होते. मी त्यांचे नाव ऐकून होते मला त्यांना भेटण्याची उत्सुकता होती आणि कार्यक्रमांमध्ये अचानक समोर डॉ.मधुसूदन घाणेकर दिसल्याबरोबर मी पहिली त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. प्रयत्न सक्सेस झाला. मी त्यांना भेटले. त्यांचा नंबर मी घेतला. एक फोटो काढला.

तो काढलेला फोटो मी त्यांना फॉरवर्ड केला. फोटो त्यांना आवडला. आणि मग इथून आमची ओळख झाली. साहित्याची देवाण-घेवाण होऊ लागली. त्यांनी त्यांच्या काही ग्रुप मध्ये मला घेतले. आणि मग आपोआपच तेथील सखींच्या सुद्धा छान ओळखी होऊ लागल्या.

 डॉ. म्हणजे 64 कलांचा अधिपती जसा गणपती तसे हे प्रत्येक विषयात पारंगत आहेत. एक पात्री कार्यक्रम, शीळ वादन गायन, लघुपट निर्मिती, अनुबोधपट निर्मिती, साहित्यातील विविध प्रकार, हस्ताक्षर मनोविश्लेषण, ज्योतिष, इत्यादी क्षेत्रात ते खूप पुढे गेलेले आहेत. विशेष म्हणजे बायपास सर्जरीनंतर 300 विश्वविक्रम प्रयोग यावर आधारित झालेले आहेत.

विश्व जोडो अभियानांतर्गत मानवधर्म सर्वश्रेष्ठ धर्म, अन्नदान, रक्तदान,अवयव दान करा असे ते सांगतात. वंचितांना आणि दिव्यांग यांना मदतीचा हात द्या असे सांगतात. नुसते सांगतच नाही तर स्वतः कृती करतात आणि मग कृती करून दाखवतात मग बोलतात. ” आधी केले मग सांगीतले ” या उक्तीप्रमाणे त्यांची कृती असते.

मधमाशी वाचवा, पाणी वाचवा, वृक्ष लागवड करा, प्राण्यांवर पक्षांवर प्रेम करा, निसर्गावर प्रेम करा, विश्वची माझे घर याप्रमाणे विश्वावर प्रेम करा, हसा हसवा आणि जग जिंका, असे अनेक संदेश त्यांनी दिलेले आहेत.

विनामूल्य मनोरंजन करताना ते सही वरून सकारात्मक स्वभाव दर्शन सांगतात. किशोर कुमार,तलक मेहमूद,मोहम्मद रफी इत्यादी गायकांची गाणी ते उत्स्फूर्तपणे जातात. हुबेहूब गातात. निखळ हसणाऱ्या बालकांना वयोवृद्धांना ‘लाफ इंटरनॅशनल अवॉर्ड’ देऊन खुश करतात.

 लहान मुलांच्या कार्यक्रमांमध्ये अगदी रममाण होतात. ‘बे दुणे चकली’,’ बाहुली कार्यक्रम’ फार रंगवून करतात. मुलांना हसायला लावतात.’ मिठू मिठू पोपट’ हे सर्टिफिकेट द्वारे त्यांना अवॉर्ड दिले जाते. मुले खुश होतात.

 यांच्याबरोबर अनेक कार्यक्रमांना मी स्वतः उपस्थित असल्याने त्यांची मनापासूनची तळमळ समजते. कोणाकडून एकही पैसा न घेता कार्यक्रम उठावदार करणे. हे डॉक्टर घाणेकरांचे वैशिष्ट्य आहे. स्वतःला कितीही बरे नसले तरी सुद्धा, समोर पब्लिक बघितले की त्यांना एक उत्स्फूर्त दाद मिळाल्याने ते खूप खुश होतात. आणि कार्यक्रमाला एक वेगळीच रंगत चढते. त्यांच्या समवेत असणारा प्रत्येक व्यक्ती हा आनंदी आणि खुश राहतो. आणि आपल्याबरोबर आलेल्या प्रत्येक व्यक्तीला आपल्यामध्ये सामावून घेऊन त्याला पुढे नेण्यासाठी जे करावे लागते ती सर्व धडपड घाणेकर सर करत असतात.

घाणेकर सरांसारखा माणूस आजवर मी पाहिलेला नाही. निरपेक्ष भावनेनं स्वतःला कार्यात झोकून काम करणं, हा स्वभाव मनाला खूप भावणारा आहे. त्यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येकाला ते समसमान संधी देतात. त्या संधीचा उपयोग करून घेईल तो छान पुढे जातो. आणि त्याच्या कामाचं कौतुक करण्यासाठी ते ट्रॉफी रूपात त्याचं कौतुक करतात. कोणाकडून एकही पैसा न घेता ट्रॉफींचे वाटप करतात. सर्वांना आनंद देण्याचा मनापासून त्यांचा प्रयत्न सफल होत असताना मी स्वतः पाहत आहे. अशा या रेग्युलस ताऱ्यास माझे शतशः प्रणाम!

    वसुधा वैभव नाईक 

    धनकवडी जिल्हा पुणे 

     मो. नं. 9823582116

Exit mobile version